YouTubeच्या माजी CEOच्या १९ वर्षीय मुलाचा मृत्यू ड्रग्ज ओव्हरडोसमुळे; पोलिस तपासात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:33 PM2024-02-22T19:33:32+5:302024-02-22T19:34:34+5:30
मृत मुलगा मार्को ट्रॉपरच्या आजीनेही ड्रग्ससेवनाच्या बातमीला दिला दुजोरा
Marco Troper died: जगातील सर्वात मोठी टेक आणि व्हिडिओ कंपनी यूट्यूबचे (YouTube) माजी सीईओ सुसान वोजिकी (CEO Susan Wojcicki) यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. १९ वर्षीय मार्को ट्रॉपर कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले कॅम्पसमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. विद्यापीठाच्या कॅम्पसच्या प्रवक्त्याने सांगितले की, मार्को गेल्या आठवड्यात त्याच्या वसतिगृहात बेशुद्धावस्थेत सापडला होता. हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे बोलले जात आहे. परंतु आता त्या मृत्युबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.
ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मार्कोचा मृत्यू झाल्याचे पोलीस आणि वसतिगृह प्रशासनाचे म्हणणे असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांकडून केला जात आहे. तसेच, मार्कोची आजी एस्थर वोजिकी म्हणाली की, तिचा नातू ड्रग्ससेवन करायचा, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असू शकतो. मार्को ट्रोपर दुपारच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळला, त्यानंतर बर्कले अग्निशमन विभागाला तात्काळ सतर्क करण्यात आले. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार, सैनिकाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, उपचार न मिळाल्याने काही वेळातच त्याला मृत घोषित करण्यात आले.
मार्कोच्या आजीचे म्हणणे आहे की मार्कोने एक ड्रग घेतले होते आणि ते कोणते ड्रग होते हे तिला माहीत नाही, पण हे नक्की आहे की ते ड्रग होते. आम्हाला माहीत असते तर कदाचित हे सर्व घडले नसते. तो एक हुशार मुलगा होता आणि सर्वांचा लाडका होता. त्यांचा मृत्यू हृदयद्रावक आहे. तो प्रत्येकाला हवा असणारा मुलगा होता. त्याचे निघून जाणे विसरणे सहज शक्य नाही. इतर कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही ड्रग्ससेवनाबाबत पुढे येऊन स्पष्टपणे बोलत आहोत. मार्कोची आजी असेही म्हणाली की, जर आपण थोडे लक्ष दिले असते तर कदाचित हे घडले नसते. आपल्या मुलांशी बोलणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.