सागरी संरक्षण, दहशतवाद विरोधात एकत्र काम करावे
By admin | Published: March 13, 2015 11:21 PM2015-03-13T23:21:45+5:302015-03-13T23:30:42+5:30
भारत आणि श्रीलंकेची सुरक्षितता ही अविभाज्य असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी संरक्षण व दहशतवादविरोधी कारवाईच्या
कोलंबो : भारत आणि श्रीलंकेची सुरक्षितता ही अविभाज्य असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी संरक्षण व दहशतवादविरोधी कारवाईच्या क्षेत्रांत सहकार्य वाढले पाहिजे, असे आवाहन केले. मोदी यांनी शुक्रवारी श्रीलंकेच्या संसदेत बोलताना श्रीलंकेची अखंडता आणि ऐक्यासाठी भारताकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
श्रीलंकेच्या संसदेत भाषण करणारे मोदी हे चौथे पंतप्रधान असून यापूर्वी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व मोरारजी देसाई यांनी भाषण केले होते. भारत आणि श्रीलंकेच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी भारतीय महासागराचे खूप महत्त्व आहे. हे दोन्ही देश एकत्र येऊन काम करणार असतील तर ही उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य होतील; मात्र त्यासाठी परस्परांत विश्वासाचे वातावरण आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
श्रीलंकेच्या नागरिकांना सिंहला व तमिळ नूतन वर्षापासून (१४ एप्रिल २०१५) टुरिस्ट व्हिसा आॅन अरायव्हल दिला जाईल व दिल्ली आणि कोलंबोदरम्यान एअर इंडियाद्वारे थेट विमानसेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी घोषणा मोदी यांनी केली. रामायणातील अवशेष विकसित करण्यासाठी भारत श्रीलंकेला सहकार्य करील व भारतात बुद्धिस्ट सर्किट तयार करायला सहकार्य करील, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)