लोकांना वाऱ्यावर सोडून पळाले अफगाणिस्तानचे अशरफ गनी, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसली त्यांची मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 05:33 PM2021-08-20T17:33:50+5:302021-08-20T17:51:14+5:30
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, क्लिंटन हिलच्या एका लक्झरी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या मरियमला आपला मास्क हातात घेऊन बघण्यात आलं.
तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये फारच गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण आहे. तेच देशाचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांची मुलगी मरियम गनी न्यूयॉर्क शहरात फिरताना आढळून आली. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार मरियमला ब्रुकलिनमध्ये एका मित्रासोबत बाहेर बघण्यात आलं. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, क्लिंटन हिलच्या एका लक्झरी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या मरियमला आपला मास्क हातात घेऊन बघण्यात आलं. मरियम ही एक फिल्ममेकर आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आहे.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांना संयुक्त अरब अमीरातमध्ये शरण देण्यात आली आहे. तालिबान काबुलच्या जवळ पोहोचले असताना रविवारी गनी अफगाणिस्तान सोडून पळाले होते. UAE ची सरकारी न्यूज एजन्सी WAM ने गनी देशात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. पण ते कुठे आहेत हे सांगितलं नव्हतं. मरियमची आई रूला गनी लेबनानची नागरिक आहे. द टाइम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, मरियम गनी म्हणाली होती की, ती अफगाणिस्तानमध्ये मागे राहिलेल्या आपल्या परिवार, मित्र आणि सहकाऱ्यांबाबत घाबरलेली आहे.
बेनिंगटनमध्ये कॉलेजमध्ये शिकवते मरियम
मरियम गनीने अमेरिकन नागरिक आणि राजकीय नेत्याकडे अफगाण शरणार्थ्यांना लवकर व्हिसा द्यावा अशी मागणी केली. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये मरियमने लिहिले की, ती त्या सर्व लोकांचे आभार मानते ज्यांनी या कठिण वेळी मदतीचा हात पुढे केला. मरियम ही एक फिल्ममेकर आहे. तिच्या वेबसाइटनुसार, मरियमच्या सिनेमांचं अनेक प्रसिद्ध फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंग झालं आहे. ती सध्या बेनिंगटनमध्ये कॉलेजमध्ये शिकवते.
अशरफ गनींनी सांगितलं का सोडलं अफगाणिस्तान?
अशरफ गनी यांनी बुधवारी रात्री फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात ते संयुक्त अरब अमीरातमध्ये असल्याचं स्पष्ट झालं. अशरफ गनी यांनी काबुल सोडून पळून जाण्याच्या निर्णयाचा बचाव केला. ते म्हणाले की, रक्तपात रोखण्याचा हाच एकमेव उपाय होता. तेच त्यांनी सरकारी खजिन्यातून १६९ मिलियन डॉलर घेऊन पळाल्याच्या आरोपही फेटाळला. गनी यांनी दावा केला की, त्यांना एक जोडी पारंपारिक कपडे आणि सॅंडलमध्ये अफगाणिस्तान सोडावं लागतं. ते म्हणाले की, त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत.