लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:16 PM2023-10-31T12:16:58+5:302023-10-31T12:18:19+5:30
सुखी कुटुंबासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.
सातत्याने कमी होत असलेल्या जन्मदराने चीनचे टेन्शन वाढवले आहे. यामुळे चीन सरकार एवढे अस्वस्थ झाले आहे की, राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी तेथील महिलांना लग्न करून अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सुखी कुटुंबासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.
जिनपिंग यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, चीनच्या महिलांची भूमिका केवळ त्यांच्याच विकासाशी संबंधित नाही तर, "कौटुंबिक सौहार्द, सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय विकास आणि राष्ट्रीय प्रगती"शीही संबंधित आहे. यासाठी, "विवाह आणि विवाहाची एक नवी संस्कृती तयार करणे आवश्यक आहे." एवढेच नाही, तर मुले जन्माला घालणे, लग्न आणि कुटुब संस्था यासंदर्भातील तरुणांचा दृष्टिकोण मजबूत व्हायला हवा, असेही जिनपिंग यांनी म्हटले आहे.
असं आहे चीनमधील घटत्या जन्मदराचं कारण -
चीनमधील तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या पालन-पोषणाचा खर्च, नोकरी नसणे, लैंगिक भेदभाव आणि लग्न करण्याची इच्छा नसणे यांसह अनेक कारणांमुळे चीनमधील तरुणींना कुटुंब वाढविण्याची इच्छा नाही. जानेवारी महिन्यात, चीनमधील नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने सहा दशकांत प्रथमच लोकसंख्येमध्ये घट झाल्याची सूचना दिली आहे. एवढेच नाही, तर देशातील लोकसंख्या वेगाने म्हातारी होत आहे. चीनमधील जन्मदराचा आकडा, गेल्या वर्षी 10% ने घसरून विक्रमी निचांकावर आला आहे. राष्ट्रीय आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये 2022 मध्ये केवळ 9.56 मिलियन जन्म झाले, 1949 नंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे.