'मंगल'मय बातमी! मंगळावर जाणारा पहिला मानव महिला असू शकेल; ‘नासा’ने पुरविली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 06:36 AM2019-03-15T06:36:23+5:302019-03-15T06:36:46+5:30
मंगळ ग्रहावर होणारा मानवाचा पहिला पदस्पर्श कदाचित एका महिलेचा असू शकेल, असे अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर होणारा मानवाचा पहिला पदस्पर्श कदाचित एका महिलेचा असू शकेल, असे अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी म्हटले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयीच्या ‘सायन्स फ्रायडे’ या रेडिओ टॉक शोसाठी दिलेल्या एका मुलाखतीत ‘नासा’ एखाद्या महिलेला प्रथमच चंद्रावर पाठविणार आहे का, असे विचारता ब्रायडेनस्टीन यांनी ‘नक्कीच’ असे उत्तर देताना सांगितले की, ‘नासा’च्या आगामी अंतराळ मोहिमांमध्ये महिला आघाडीवर असतील. त्यामुळे यानंतर चंद्रावर पाठविला जाणारा पहिला माणूस महिला असू शकते. एवढेच नव्हे तर मंगळावर पडणारे मानवाचे पहिले पाऊलही कदाचित एखाद्या महिलेचे असू शकेल. मात्र चंद्र किंवा मंगळ मोहिमेसाठी त्यांनी कोणत्याही महिला अंतराळवीराचा नावाने उल्लेख केला नाही. (वृत्तसंस्था)
महिला मासाचे निमित्त
ब्राईनस्टीन यांनी असेही सांगितले की, अमेरिकेत सध्या राष्ट्रीय महिला मास सुरू आहे. त्याचे औचित्य साधून मार्चच्या अखेरीस अॅने मॅक््लीन व ख्रिस्तिना कोच या दोन महिला अंतराळवीरांना ‘स्पेस वॉक’ करण्यासाठी अंतराळात पाठविले जाईल. फक्त महिलांनी अंतराळात मारलेला तो पहिला फेरफटका असेल.