बांगलादेशात महिला पत्रकाराची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:21 AM2018-08-30T06:21:18+5:302018-08-30T06:21:41+5:30
अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला; पती व सासऱ्याचा हात असल्याचा कुटुंबीयांचा दावा
ढाका : बांगलादेशमध्ये एका खासगी वृत्तवाहिनी व वृत्तपत्रासाठी काम करणाºया महिला पत्रकाराची तिच्या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केली. ती पबना जिल्ह्यातील राधानगर भागात राहात होती. या हत्येमागे तिचा पती व सासºयाचा हात असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सुवर्णा अख्तर नोडी असे तिचे नाव असून ती ३२ वर्षे वयाची आहे. ती आनंद टीव्ही ही वृत्तवाहिनी व दैनिक जाग्रोतो बांगला या वृत्तपत्रासाठी काम करत होती. नोडी हिला नऊ वर्षांची मुलगी आहे. मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास तिच्या घरी १० ते १२ अज्ञात इसम आले. त्यांनी घराची बेल वाजवताच सुवर्णाने दरवाजा उघडला. तत्क्षणी तिच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करुन ते सारेजण तिथून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुवर्णाला रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
बहिणीनेही केला धमकावल्याचा दावा
सुवर्णावर झालेल्या हल्ल्याचा बांगलादेशमधील पत्रकारांच्या सर्व संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. या हत्येमागे तिचा पती रजीब हुसेन व सासरा अबुल हुसेन यांचा हात असावा, असा तिच्या कुटुंबीयांना संशय आहे. रजीबनेच हा हल्ला केल्याचे सुवर्णाने अखेरचा श्वास घेण्याच्या आधी आपल्याला सांगितले, असा दावा तिच्या आईने केला. हुंडा मागितल्याबद्दल तिने पतीवर खटला दाखल केला होता व घटस्फोटाची प्रक्रियाही सुरू केली होती.
या खटल्यात तिची बहीण चंपा बेगमची मंगळवारीच साक्ष झाली होती. त्या आधी न्यायालयाच्या आवारात रजीब व त्याच्या साथीदारांनी आपल्याला धमकावले होते असा दावा चंपा बेगमने केला आहे.