७.१ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस; ५३ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:27 IST2025-01-07T11:24:57+5:302025-01-07T11:27:57+5:30
तिबेटमधील भूकंपात आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

७.१ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस; ५३ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
Earthquake In Tibet:नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील शिजांग या डोंगराळ भागात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून ६४ जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाडून मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
लोक गाढ झोपेत असतानाच भारत, नेपाळ आणि चीन ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-तिबेट सीमेजवळ होता. या शक्तिशाली भूकंपामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर त्याचा प्रभाव चीन आणि भारतातील अनेक शहरांमध्येही दिसून आला. तिबेटमधील भूकंपामुळे दिल्ली, बिहार, बंगालसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
चीनच्या भूकंप निरीक्षण संस्थेने भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवली. भूकंपामुळे तिबेटमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. सकाळी ९:०५ वाजता शिआन स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहरातील डिंगरी काउंटीला भूकंपाचा धक्का बसल्याने ५३ लोकांचा मृत्यू झाला आणि ६४ हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तिबेटमध्ये सकाळच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूकंपानंतर काही सेकंदात किती इमारती मोडकळीस आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने घाबरलेले लोक घराबाहेर पळताना दिसत आहेत.
नेपाळ, भूतान आणि भारताच्या काही भागांसह शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा प्रभाव लक्षणीय होता ज्यामुळे अनेक ठिकाणी इमारती हादरल्या. तिबेटमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्राजवळील भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यापैकी काही भूकंपाच्या केंद्रापासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर होते.
तिबेट शेजारील नेपाळमध्ये सक्रिय भूकंपीय क्षेत्र आहे. ज्यामुळे वारंवार आणि कधीकधी आपत्तीजनक भूकंप होत असतात. याआधी २०१५ मधील ७.८ रिश्टर स्केलच्या मोठ्या भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले होते. त्यात जवळपास ९,००० लोक मारले गेले आणि २२,००० हून अधिक लोक जखमी झाले होते.