चीनमध्ये मोठा भूकंप, ११८ ठार; ५०० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 05:58 AM2023-12-20T05:58:49+5:302023-12-20T05:58:55+5:30
बीजिंग/ जिशिशान : चीनमध्ये मध्यरात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपात ११८ लोक मृत्युमुखी पडले असून, ५०० हून अधिक जखमी झाले आहेत. ...
बीजिंग/ जिशिशान : चीनमध्ये मध्यरात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपात ११८ लोक मृत्युमुखी पडले असून, ५०० हून अधिक जखमी झाले आहेत. वायव्य चीनच्या दुर्गम पर्वतीय भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ एवढी नोंदवली गेली. तत्पूर्वी भारत आणि पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते.
गान्सू व किनघई प्रांतात सोमवारी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू लियुगोऊ शहरात जमिनीपासून १२० कि.मी. खोलीवर होता. त्यानंतर काही तासांनी मंगळवारी, सकाळी ९:४६ वाजता, शेजारच्या शिनजियांग उईघुर स्वायत्त प्रदेशात दुसरा भूकंप झाला.
धक्क्यांवर धक्के, नदीवरील पुलाला तडा
आतापर्यंत ३२ भूकंपोत्तर धक्के जाणवले आहेत. त्यापैकी सर्वांत मोठा ४.० रिश्टर स्केलचा होता, असे प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते हान शुजुन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परिवहन मंत्रालयाने मंगळवारी सकाळी सांगितले की, भूकंपामुळे पित नदीवरील पुलाला तडा गेला आहे.
अनेक रेल्वे रद्द
भूकंपामुळे जिशिशानमध्ये ६,३८१ घरांचे नुकसान झाले आहे. रेल्वे प्राधिकरणाने भूकंपग्रस्त भागात प्रवासी व मालवाहू गाड्या रद्द
केल्या आहेत.