रशियातील कोळसा खाणीत भीषण स्फोट, 52 कामगारांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:34 AM2021-11-26T11:34:57+5:302021-11-26T11:36:44+5:30
स्फोट होऊन खाणीत भीषण आग लागली, अचानक लागलेल्या आगीमुळे कामगारांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही.
रशियातील सायबेरियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील केमेरोवो भागातील कोळसा खाणीत लागलेल्या आगीत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. यात सहा बचावकर्त्यांचाही समावेश आहे. गुरुवारी घडलेली ही घटना मागील सर्वात भीषण घटना आहे. रशियन न्यूज एजन्सी TASS ने दिलेल्या माहितीनुसार, लिस्टव्यझनाया कोळसा खाणीत अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाचवण्याची संधी नव्हती. अजूनही अनेक मृतदेह आत आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोळशाच्या धुरामुळे गुडमतरुन 11 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. हे कामगार 250 मीटर खोलीवर काम करत होते. यानंतर आगीमुळे इतर कामगारांचा मृत्यू झाला. अपघातावेळी खाणीत 285 जण काम करत होते. सध्या 38 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
मोठ्या स्फोटानंतर आग लागली
स्थानिक प्रशासनाने सांगितल्यानुसार, एका जोरदार स्फोटानंतर ही आग लागली. हा स्फोट अचानक झाला, त्यामुळे अनेकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच बचावकर्ते आणि पोलीस येथे पोहोचले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच, केमेरोव्हो प्रदेशाने शुक्रवार ते रविवार तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
घटनेचा तपास सुरू
सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रशियाच्या तपास समितीने या घटनेचा तपास सुरू केला आहे. या स्फोटामागील नेमके कारण काय याचा तपास केला जाणार आहे. जखमींना शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. 2004 मध्ये या खाणीत मिथेनचा स्फोट झाला होता, त्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता.