मसूद अजहर मोकळाच!
By admin | Published: January 19, 2016 03:00 AM2016-01-19T03:00:34+5:302016-01-19T10:22:00+5:30
पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याला पाकिस्तान सरकारने अद्याप अटक केली नाही किंवा त्याला नजरकैदही केले नाही.
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याला पाकिस्तान सरकारने अद्याप अटक केली नाही किंवा त्याला नजरकैदही केले नाही. त्यासोबतच मसूदच्या तीन सहकाऱ्यांना ज्या प्रकरणात स्थानबद्ध करण्यात आले आहे, त्याचा पठाणकोट हल्ल्यात काडीचाही संबंध नाही.
गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजहरच्या विरोधात पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या या म्होरक्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यताही दिसत नाही.
पाकिस्तानी सुरक्षा संस्थांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन कनिष्ठ स्तरावरील पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले आहे. परंतु त्यांना काही दस्तऐवजांच्या संदर्भात पकडण्यात आले आहे आणि त्यांच्या अटकेचा पठाणकोटमधील हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पठाणकोट हल्ल्याच्या घटनेनंतर मसूद अजहर याला स्थानबद्ध करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या, ज्या असत्य होत्या आणि काही पाकिस्तानी संस्थांनीच या बातम्या पेरल्याचा संशय आहे, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जैश-ए-मोहम्मदच्या एखाद्या सदस्याला आपण अटक वा स्थानबद्ध केल्याचे वा त्यांच्याविरुद्ध पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाकिस्तानने अद्याप भारताला अधिकृतरीत्या कळविलेले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)