शॉपिंग करणं पडलं महागात,आफ्रिकेतील एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष देणार राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 11:50 AM2018-03-10T11:50:43+5:302018-03-10T16:16:50+5:30
मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्ष अमिना गुरिब फकिम यांनी आर्थिक घोटाळ्याच्या आरोपानंतर आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पोर्ट लुईस- मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्ष अमिना गुरिब फकिम यांनी आर्थिक घोटाळ्याच्या आरोपानंतर आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक निधीतून आपल्या वैयक्तिक आयुष्यात लागणा-या वस्तू विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अमिना यांनी हे आरोप फेटाळले असून आपण ते पैसे परत केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
अमिना गुरिब फकिम यांचा निर्णय मॉरिशससाठी महत्त्वाच्या आणि आनंदाच्या काळात घेतला गेला आहे. मॉरिशस बेटांना स्वातंत्र्य मिळून पुढील आठवड्यात ५० वर्षे पूर्ण होत आहेत. नेमक्या या महत्त्वाच्या वेळेस राष्ट्राध्यक्षांना खुर्ची सोडावी लागली आहे. राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देण्याचे निश्चित केल्याचे आपल्याला कळवण्यात आले आहे अशी माहिती देशाचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी दिली आहे.अमिना गुरिब या वैज्ञानिक असून २०१५ साली त्यांची मॉरिशसच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली होती. हे पद नामधारी असले तरी संपूर्ण आफ्रिका खंडात त्या सध्या एकमेव महिला राष्ट्रप्रमुख आहेत.
लंडन येथील प्लॅनेट अर्थ इन्स्टिट्यूटनं दिलेल्या क्रेडिट कार्डचा उपयोग करुन अमिना यांनी कपडे, दागिने आणि इतर वस्तू घेतल्याची माहिती मॉरिशसच्या ले एक्स्प्रेस वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. हे पैसे त्यांनी धर्मादाय कामासाठी वापरणे अपेक्षित होते. मॉरिशस हे आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असणारे अत्यंत चिमुकले राष्ट्र आहे. दोन शतकांपूर्वी भारतातून या बेटांवर ऊस आणि इतर नगदी पिकांच्या मळ्यांमध्ये काम करण्यासांठी भारतीय मजूरांना इंग्रजांनी नेले होते. सध्या मॉरिशसनध्ये बिहारी, मराठी, तमिळ आणि इतर प्रांतातील भाषिकांचे प्राबल्य आहे. तर या देशात इंग्रजी, फ्रेंच आणि माँरिशियन क्रिओल या भाषा बोलल्या जातात.