'हिंदूंना टार्गेट करुन हल्ले केले जात आहेत', बांग्लादेशच्या मुद्द्यावर भारताची कठोर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 19:09 IST2024-11-29T19:08:52+5:302024-11-29T19:09:20+5:30
MEA On Bangladesh Ruckus: बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत.

'हिंदूंना टार्गेट करुन हल्ले केले जात आहेत', बांग्लादेशच्या मुद्द्यावर भारताची कठोर भूमिका
Bangladesh Ruckus: बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, आता भारताने शुक्रवारी (29 नोव्हेंबर) बांग्लादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. बांग्लादेशातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारताने बांग्लादेश सरकारकडे हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा सातत्याने आणि जोरदारपणे मांडला आहे.
बांग्लादेशातील अंतरिम सरकारने सर्व अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल आम्ही चिंतीत आहोत. या घडामोडी नाकारता येणार नाहीत. इस्कॉन ही सामाजिक सेवेसाठी ओळखली जाणारी जागतिक स्तरावरील प्रसिद्ध संस्था आहे. आम्ही पुन्हा एकदा बांग्लादेशला अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी सर्व पावले उचलण्याचे आवाहन करतो.
चिन्मय दास यांच्या अटकेवर परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेवर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही आशा करतो की, या प्रकरणाचे पारदर्शक पद्धतीने निराकरण होईल. या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाने दुसऱ्यांदा असे विधान केले आहे.