काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ३0 डिसेंबरनंतरही उपाययोजना
By admin | Published: November 13, 2016 04:48 AM2016-11-13T04:48:40+5:302016-11-13T04:48:40+5:30
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ३0 डिसेंबरनंतर आणखी उपाय करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले. काळा पैसा बाळगणाऱ्यांना आता कुठल्याही परिस्थितीत
कोबे : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ३0 डिसेंबरनंतर आणखी उपाय करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले. काळा पैसा बाळगणाऱ्यांना आता कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे मोदी म्हणाले. प्रामाणिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. हजार-पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय हे ‘स्वच्छ भारत अभियान’च आहे, असे ते म्हणाले.
जपानमधील कोबे शहरात भारतीय समुदायासमोर बोलताना मोदी यांनी वरील वक्तव्य केले. रद्द करण्यात आलेल्या हजार-पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना ३0 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही काळा पैसा शोधून काढण्यासाठी नव्या योजना येऊ शकतील, असा इशारा त्यांनी दिला.
मोदी म्हणाले की, मी पुन्हा एकदा जाहीरपणे सांगू इच्छितो की, ही योजना संपल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांना धक्क्याला लावण्यासाठी पुन्हा नवी योजना येणार नाही, असे गृहीत धरू नका. काही हिशेबाबाहेरचे समोर आलेच, तर मी स्वातंत्र्यापासूनचे सगळे रेकॉर्ड चेक करेन. त्यासाठी लागतील तेवढे लोक मी तैनात करेन. प्रामाणिक लोकांना कोणताही त्रास होणार नाही; मात्र दोषींना कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
आशीर्वाद मिळतील, असे वाटले नव्हते
राष्ट्रहित लक्षात घेऊन लोक सहा-सहा तास रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत आहेत. मी माझ्या देशवासीयांना सलाम ठोकतो. २0११नंतरच्या संकटानंतर जपानी लोकांनीही अशाच धैर्याचे प्रदर्शन केले होते.
ही योजना आणल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात याचा मी दीर्घ काळ व गंभीर विचार केला. योजना गोपनीय ठेवणेही महत्त्वाचे होते.
ती अचानक जाहीर करणे आवश्यक होते; पण मला त्यातून आशीर्वाद मिळतील, असा विचार मी केला नव्हता, असेही पंतप्रधान म्हणाले.
नोटांबाबत गैरसोय सोसून लोक निर्णयाचे स्वागत करत आहेत!
गंगेत हजार-पाचशेच्या नोटा वाहत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यासंदर्भाने मोदी म्हणाले की, जे लोक मला ओळखतात, ते हुशारही आहेत.
काळा पैसा बँकेत भरण्याऐवजी गंगेत नेऊन टाकलेला बरा असा विचार ते करीत आहेत. गैरसोय सोसून लोक पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत आहेत.