मालदीवमध्ये प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी : दोन भारतीय पत्रकारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 08:03 PM2018-02-09T20:03:19+5:302018-02-09T20:05:48+5:30
मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे. दरम्यान, आणीबाणी जाहीर केल्यानंतर येथे प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू झाली अाहे.
माले - मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे. दरम्यान, आणीबाणी जाहीर केल्यानंतर येथे प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू झाली असून, शुक्रवारी येथे दोन भारतीय पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही पत्रकार एएफपी या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकारांपैकी मणी शर्मा हे अमृतसर येथे राहणारे आहेत. तर आतीश रावजी पटेल हे भारतीय वंशाचे पत्रकार लंडन येथील राहणारे आहेत. या दोन्ही पत्रकारांना मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मालदीवमधील एक खासदार अली जहीर म्हणाले, की आता येथे माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. काल रात्री एक टीव्ही वाहिनी बंद करण्यात आली आहे. आम्ही या पत्रकारांच्या तात्काळ सुटकेची तसेच देशात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेची मागणी करतो.
दरम्यान, मालदीवमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे आशियातील दोन महाशक्ती असलेले भारत आणि चीन हे देश आमने-सामने आले आहेत. मात्र मालदीवमध्ये उद्भवलेल्या राजकीय संकटातून मार्ग काढण्यासाठी आपण भारताच्या संपर्कात असल्याचे चीनने म्हटले आहे. मालदीवप्रश्नी भारतासोबत वाद निर्माण करण्याची आमची इच्छा नाही. हा मालदीवचा देशांतर्गत प्रश्न असून, तो हाताळण्यासाठी तो देश सक्षम आहे. त्यामुळे या प्रश्नी कुठल्या बाहेरील शक्तीने हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे मत चीनने मांडले आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी फोनवरुन बोलणे झाले. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये मालदीव, अफगाणिस्तान आणि म्यानमारमधल्या परिस्थितीवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी मालदीवमधल्या राजकीय संकटाबद्दल चिंता व्यक्त करतानाच कायद्याचे राज्य आणि लोकशाही मुल्यांचे महत्व अधोरेखित केले असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले.