व्हाईट हाऊस घेणार शीख, मुस्लिम समुदायांची बैठक
By admin | Published: December 16, 2015 04:02 AM2015-12-16T04:02:07+5:302015-12-16T04:02:07+5:30
अमेरिकेत मुस्लिम आणि शीख समाजाच्या नागरिकांचा द्वेष करण्याचे प्रमाण वाढलेले असताना व्हाईट हाऊस आता या समुदायांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत मुस्लिम आणि शीख समाजाच्या नागरिकांचा द्वेष करण्याचे प्रमाण वाढलेले असताना व्हाईट हाऊस आता या समुदायांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहे. या समाजापुढील आव्हाने आणि समस्या यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
व्हाईट हाऊसचे माध्यम विभागाचे सचिव जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, व्हाईट हाऊसचे प्रतिनिधी विविध धार्मिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. तर या बैठकांमध्ये अध्यक्ष सहभाग घेणार नसल्याचेही सांगण्यात आले. सिसिलिया मुनोज व्हाईट हाऊसच्या वतीने चर्चेत सहभाग घेतील.
कॅलिफोर्नियात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानी वंशाच्या एका दाम्पत्याकडून १४ जणांचे हत्याकांड झाल्यानंतरही व्हाईट हाऊसने काही संघटनांची बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा अशी बैठक घेण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेतील शीख व मुस्लिम समुदायाच्या छोट्या समूहांची बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अमेरिकेत शीख समजाला लक्ष्य करण्याचे प्रकारही अलीकडच्या काळात वाढले आहेत. सॅन दियागो शहरात फुटबॉलचा सामना सुरू असताना शीख गटाला सुरक्षा रक्षकांनी स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला होता, तर २०१२ मध्ये शिखांच्या एका धार्मिक स्थळाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला होता.