स्थलांतराच्या प्रश्नावर होणार बैठक
By admin | Published: September 1, 2015 01:14 AM2015-09-01T01:14:29+5:302015-09-01T01:14:29+5:30
सीरियन आणि इतर आशियाई- आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या लोंढ्यावर चर्चा करण्यासाठी युरोपियन युनियनच्या देशांमधील गृहमंत्री आणि सामाजीक न्याय मंत्री एकत्रित चर्चा करणार आहेत.
ब्रुसेल्स : सीरियन आणि इतर आशियाई- आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या लोंढ्यावर चर्चा करण्यासाठी युरोपियन युनियनच्या देशांमधील गृहमंत्री आणि सामाजीक न्याय मंत्री एकत्रित चर्चा करणार आहेत. ग्रीस, मॅसिडोनिया, सर्बिया, हंगेरी असा प्रवास करत हा लोंढा आता जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे युरोपियन युनीयन त्यावर गांभीर्याने चर्चा करणार आहे. दोन आठवड्यांमध्ये यावर ब्रुसेल्समध्ये बैठक होणार आहे.
जर्मनी, इंग्लंड व फ्रान्सने लक्झेंबर्गच्या अध्यक्षतेखाली स्थलांतरितांच्या प्रश्नावर १४ सप्टेंबरपुर्वी बैठक घेण्याची विनंती केली होती. जर्मनीचे थॉमस डी मेझेरे, ब्रिटनच्या थेरेसा मे, फ्रान्सचे बर्नार्ड काझ्नेवू यांनी स्थलांतरितांच्या युरोपमधील प्रवासाच्या सुरक्षेवर शनिवारी पॅरिसमध्ये चर्चा केली. सीसिलीमार्गे भूमध्य समुद्रातून इटलीत येणारे स्थलांतरित, इंग्लंडमध्ये टनेलरेल्वेच्या मार्गे धुसण्याची धडपड करणारे केलेईमधील स्थलांतरित तसेच ग्रीसमार्गे घुसलेल्या सीरियन स्थलांतरितांमुळे सध्या संपुर्ण युरोपवर ताण आलेला आहे. स्थलांतरितांनी जर्मनी, इंग्लंड आणि अगदी नॉर्वे, स्वीडनपर्यंत जाण्याचे ध्येय ठेवून प्रवास सुरु केलेला आहे.
ब्रिटनच्या गृहमंत्री थेलेसा मे यांनी स्थलांतरितांच्या प्रश्नाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या वर्षात युरोपात साडेतीन लाख इतके स्थलांतरित आले आहे. या सर्व परिस्थितीचे खापर त्यांनी युरोपियन युनियनवर फोडले आहे. इंग्लंडमध्ये वर्षभरात आलेल्या दहापैकी चार लोक युरोपियन युनियनमधील आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी राग व्यक्त केला आहे. ज्या देशात आपल्याला जायचे आहे तेथे रोजगार तयार असेल तरच स्थलांतर करावे असेही थेलेसा यांनी सांगितले आहे.