Mehran Karimi Nasseri: इराणने हाकलले, ब्रिटनने नाकारले! १८ वर्षे विमानतळावर राहिलेल्या इराणी निर्वासिताचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:33 AM2022-11-14T08:33:36+5:302022-11-14T08:38:10+5:30
Mehran Karimi Nasseri: इराणमधून परागंदा व्हावे लागलेल्या, ब्रिटनने राजकीय आश्रय नाकारलेल्या व त्यामुळे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील चार्ल्स द गॉल विमानतळावरच १९८८ सालापासून राहात असलेल्या मेहरान करिमी नासेरी यांचे त्याच विमानतळावरील २ एफ क्रमांकाच्या टर्मिनलवर हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी निधन झाले.
पॅरिस : इराणमधून परागंदा व्हावे लागलेल्या, ब्रिटनने राजकीय आश्रय नाकारलेल्या व त्यामुळे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील चार्ल्स द गॉल विमानतळावरच १९८८ सालापासून राहात असलेल्या मेहरान करिमी नासेरी यांचे त्याच विमानतळावरील २ एफ क्रमांकाच्या टर्मिनलवर हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी निधन झाले. ते ८० वर्षे वयाचे होते. नासेरी यांच्या जीवनकथेवरून प्रेरणा घेऊन प्रख्यात दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी ‘दी टर्मिनल’ हा चित्रपट बनविला होता.
सर आल्फ्रेड या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या मेहरान नासेरी यांची आई स्कॉटिश असूनही त्यांना ब्रिटनने राजकीय आश्रय नाकारला होता. त्यामुळे ते विमानतळावरच निर्वासिताचे जीणे जगत होते. त्यांच्या सोबत नेहमी त्यांचे सामान असायचे.
विमानतळावर काय केले?
आपल्या हाती असलेल्या वेळेचा उपयोग त्यांनी रोजनिशी लिहिणे, विविध पुस्तके वाचणे, अर्थशास्त्राचा अभ्यास करणे अशा गोष्टींसाठी केला. नासेरी यांच्या आयुष्यावर बेतलेला दी टर्मिनल हा चित्रपट २००४ साली स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी बनविला.