मेहूल चोकसी लबाडच, त्याचे लवकरच भारताकडे प्रत्यार्पण करणार, अँटिग्वाच्या पंतप्रधानांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 08:54 AM2019-09-26T08:54:12+5:302019-09-26T08:55:38+5:30
भारतातून फरार झालेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चौकसीचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता वाढली आहे.
न्यूयॉर्क - भारतातून फरार झालेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चौकसीचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता वाढली आहे. मेहूल चोकसी हा लबाडच असल्याचे सांगत अँटिग्वा आणि बर्बुडाच्या पंतप्रधानांनी मेहूल चौकसीच्या प्रत्यार्पणाचे संकेत दिले आहे. मेहूल चौकसीने केलेल्या गुन्ह्यांबाबत आम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येईल, असे आश्वासन अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी दिले आले.
मेहूल चोकसी हा सध्या अँटिग्वामध्ये लपला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या संमेलनात सहभाग घेण्यासाठी न्यूयॉर्क येथे आलेले अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांच्याकडे मेहूल चोकसीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, ''मेहूल चोकसी हा लबाड असल्याची पुरेशी माहिती मला मिळाली आहे. मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे सध्या याबाबत आम्ही काही करू शकत नाही. मात्र मेहूल चोकसीला अँटिग्वा आणि बर्बुडामध्ये ठेवण्याची आमची इच्छा नाही.''
#WATCH Antigua & Barbuda PM Gaston Browne: Got subsequent information that Mehul Choksi is a crook, he doesn't add value to our country. He will be deported ultimately after he exhausts appeals, Indian officials are free to investigate based on his willingness to participate. pic.twitter.com/FbAaIml0Fv
— ANI (@ANI) September 25, 2019
भारतीय अधिकाऱ्यांना मेहूल चोकसीची चौकशी करण्याची परवानगी देणार का अशी विचारणा केली असता, ब्राऊन यांनी मेहूल चोकसीची चौकशी करण्यास आपली काहीच हरकत नसल्याचे सांगितले. "भारतीय अधिकारी हवी तेव्हा मेहूल चोकशीची चौकशी करू शकतात. मात्र त्यासाठी चोकसीने सहकार्य केले पाहिजे. मात्र सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकरणात सरकार काहीच करू शकत नाही.''
दरम्यान, मेहूल चोकसी हा बदमाश आहे हे माहीत असते तर त्याला अँटिग्वाचे नागरिकत्व दिले नसते. आता त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाईल, कारण त्याच्यामुळे अँटिग्वाची प्रतिष्ठा वाढलेली नाही.''
मेहूल चोकसी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी खोटी कागदपत्रे बनवून पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला होता. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर नीरव मोदी आणि मेहूल चोकसी परदेशात पसार झाले होते.