मेहुल चोक्सीला भारतात पाठविणार, अँटिग्वा पंतप्रधानांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:14 AM2021-05-28T10:14:52+5:302021-05-28T10:15:00+5:30
Mehul Choksi News: भारतातून परागंदा झाल्यानंतर चोक्सी हा अँटिग्वात लपून बसला होता. काही दिवसांपूर्वी तो अँटिग्वातून पळून डॉमिनिकात गेला होता. तेथे त्याला आता अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील १३,५०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील एक फरार आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकात अटक करण्यात आली असून, त्याला परस्पर भारतात पाठविण्यात येईल, असे अँटिग्वा व बरबुडाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊन यांनी म्हटले आहे. भारताने त्याच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी, असेही ब्राऊन यांनी म्हटले आहे.
भारतातून परागंदा झाल्यानंतर चोक्सी हा अँटिग्वात लपून बसला होता. काही दिवसांपूर्वी तो अँटिग्वातून पळून डॉमिनिकात गेला होता. तेथे त्याला आता अटक करण्यात आली आहे.ब्राऊन यांनी सांगितले की, मी डॉमिनिकाच्या पंतप्रधानांशी बोललो आहे. मी त्यांना सांगितले की, चोक्सीला अटक करून अँटिग्वाला पाठवू नका, त्याऐवजी त्याला परस्पर भारतात पाठवा. त्याला इथे घटनात्मक संरक्षण असल्यामुळे आम्ही त्याला परत स्वीकारणार नाही.
ब्राऊन यांनी सांगितले की, ‘देशात अवैध प्रवेश केला म्हणून चोक्सीला डॉमिनिकाच्या सरकारने अटक करावी आणि त्याला अवैध घोषित करून भारतात पाठवावे.’ मेहुल चोक्सी याला डॉमिनिकामध्ये कोणतेही घटनात्मक संरक्षण नाही. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण करणे सोपे होईल.
ब्राऊन यांनी म्हटले की, अँटिग्वा सोडून चोक्सीने घोडचूक केली आहे. डॉमिनिकाचे सरकार सहकार्य करीत आहे. आम्ही भारत सरकारलाही याची माहिती दिली असून, त्याच्या प्रत्यार्पणाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्याचा मास्टर माइंड नीरव मोदी याचा मामा असून त्याचाही या घोटाळ्यात सहभाग आहे. त्याला बुधवारी डॉमिनिकात अटक करण्यात आली. तो सध्या तेथील सीआयडीच्या ताब्यात आहे. चोक्सी हा जानेवारी २०१८ पासून अँटिग्वा व बरबुडामध्ये होता. तो अलीकडे बेपत्ता झाला होता.
प्रत्यार्पणाविरुद्ध करणार अपील
मेहुल चोक्सी याचे वकील विजय अगरवाल यांनी लोकमतला सांगितले की, चोक्सी याचे बेकायदेशीररीत्या प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरुद्ध डॉमिनिका न्यायालयात अपील केले जाईल. डॉमिनिकामध्ये ब्रिटिश कायदे लागू असून, त्यात मानवाधिकाराची काळजी घेतली जाते.
अगरवाल यांनी सांगितले की, चोक्सी हा अँटिग्वाचे नागरिक असून, तो डॉमिनिकात स्वत:च्या इच्छेने गेलेला नाही. त्यांला तेथे कसे नेले गेले याचा आम्ही शोध घेत आहोत. अँटिग्वाच्या उच्च न्यायालयाने चोकसी याचे प्रत्यार्पण होऊ शकत नाही, असा निकाल यापूर्वीच दिला आहे.