चुकून बँक खात्यात ट्रान्सफर झाले 57 कोटी; आता पैसे खर्च केल्यानंतर व्याजासह परत करावे लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 09:32 AM2022-09-01T09:32:26+5:302022-09-01T09:32:56+5:30
Melbourne : ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, 10.4 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स एका महिलेच्या खात्यात चुकून जमा झाले होते. म्हणजेच भारतीय रुपयात हिशोब केला तर ते 57 कोटींच्या आसपास आहे.
मेलबर्न : अनेकदा चुकून लोकांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होते. सहसा अशा परिस्थितीत लोकांना जमा झालेले पैसे बँकेत परत करावे लागतात. भारतात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता असेच एक प्रकरण ऑस्ट्रेलियातून समोर आले आहे. पण, याठिकाणी घडलेले प्रकरण जरा गुंतागुंतीचे आहे. कारण, ज्यांच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले. ते त्यांनी लगेच खर्च केले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने संबंधिताला व्याजासह पैसे परत करावे लागणार आहेत.
ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, 10.4 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स एका महिलेच्या खात्यात चुकून जमा झाले होते. म्हणजेच भारतीय रुपयात हिशोब केला तर ते 57 कोटींच्या आसपास आहे. आता हे सर्व पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने महिलेला दिले आहेत. तसेच, या महिलेला 10 टक्के व्याजासह कायदेशीर खर्चही भरावा लागेल, असेही सांगण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात मेलबर्नचे रहिवासी थेवामनोग्री मॅनिवेल यांना क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज crypto.com कडून 100 डॉलर रिफंड मिळणार होता. पण, सिंगापूरस्थित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मने मोठी चूक केली. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी चुकून 10,474,143 डॉलर दुसर्या क्लायंट मॅनिवेल यांना ट्रान्सफर केले. त्यानंतर मॅनिवेल यांनी आपली मुलगी आणि बहीण अशा कुटुंबातील सदस्यांसह इतर सहा जणांना पैसे भेट म्हणून दिले.
आता घर विकावे लागेल
ऑडिटमध्ये ही चूक उघड झाल्यानंतर crypto.com ने कायदेशीर कारवाई सुरू केली. गेल्या शुक्रवारी न्यायालयाने Crypto.com च्या बाजूने निर्णय दिला आणि सर्व पैसे आणि अतिरिक्त खर्च देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, मॅनिवेल यांच्या बहिणीला मेलबर्नमधील 1.35 मिलियन डॉलरचे घर विकावे लागेल. जे पूर्णपणे चुकीच्या पेमेंटद्वारे देण्यात आल्याचा आरोप आहे.