झांबिया, केनिया आणि रवांडामध्ये साजरा झाला मासिक पाळीचा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:58 PM2021-05-23T16:58:04+5:302021-05-23T17:02:05+5:30
मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीअतिशय कल्पक मार्गांचा वापर केला गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मासिका महोत्सव, हा मासिक पाळीचा, सोहळा झांबियासह केनिया आणि रवांडामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीअतिशय कल्पक मार्गांचा वापर केला गेला. लुसाका या राजधानीच्या शहरात, प्लॅन इंटरनॅशनल झांबिया या संस्थेमार्फत लोकसंगीत, संगीत-नृत्य त्याचबरोबर कापडी पॅड व मेन्स्ट्रुलकप वापरण्याची प्रात्यक्षिकांतून मासिक पाळी बद्दल संवाद साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले.
चित्र रेखाटन, डिजिटल स्क्रीन अशाप्रकारे गर्भाशयाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या, याचबरोबर गर्भाशयाच्या आकाराचा केक देखील कापण्यात आला. या सगळ्यातून, मासिक पाळी हि अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असून त्यावर मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे यावर भर दिला. अपेक्षेपेक्षा दीडशे टक्क्यांनी जास्त जास्त संख्येने उपस्थिती लाभल्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. झांबियाप्रमाणेच केनियात देखील हा सोहळा पार पडला. लिव्ह हेल्थि ईनीशिअएटीव्हीज तसेच युएनएफपीए केनिया, रिअल रिलीफ, वॉश अलायंस केनिया आणि केनिया सरकार यांच्या सहविद्यमानाने मासिक पाळी आरोग्याविषयीच्या सरकारी धोरणाबाबत चर्चा यशस्वी रित्या पार पाडली. या चर्चेअंती मासिक पाळी आरोग्यसंबंधी सरकारी धोरणात, आणखीन काम व गुंतवणूकची गरज आहे असा निष्कर्ष काढण्यात आला.
म्युज फौंडेशनच्यावतीने ठाण्यातून मासिका महोत्सवाची सुरुवात झाली असून त्या अंतर्गत तीन देशांत हा उत्सव साजरा करण्यात आला.
मासिक पाळीबद्दल शिक्षण देणे हे अनेक शाश्वत विकास ध्येये (एसडीजी) साध्य करण्याचा तसेच शाश्वत मार्गाने मासिक पाळी हाताळण्यासाठीचा अत्यंतिक महत्वाचे आहे. ह्या सोहळ्याचे उद्दिष्ट हे विविध उपक्रमांतून मुलामुलींना मासिक पाळीच्या सुरक्षित आणि निरोगी पद्धतीचं महत्व पटवून देणे होते. रॉंडामध्ये दुकाटाझे यांनी विविध उपक्रम, मासिक पाळीवर आधारित खेळांचे आयोजन आणि ३०० पॅड्सचे वाटप करून हा सोहळा साजरा केला. मुलामुलींचे लहान गट पाडून त्यांच्यात मासिक पाळी विषयी समूह चर्चा घेण्यात आली, पुढे या चर्चांमधील मुद्दे त्यांनी आणखी मोठया गटांसमोर मांडले. क्रीडाप्रकारांत सॅनिटरी नॅपकिन्स उचलण्याची शर्यत समाविष्ट होती. हि शर्यत बघणाऱ्यांनी स्पर्धकांचा जोश वाढवण्याचे काम केले.