जगातील सर्वात वयोवृद्ध वानराला दयामरण; दोन वर्षांपूर्वी झाली होती ‘गिनीज बुका’त नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 04:24 AM2018-06-21T04:24:33+5:302018-06-21T04:24:33+5:30
इंडोनशियाच्या सुमात्रा बेटावर आढळणाऱ्या ओरांगउटांग वानराच्या प्रजातीपैकी जगातील सर्वात वयोवृद्ध म्हणून ओळखल्या जाणा-या ‘पुआन’ या मादीला आॅस्ट्रेलियाच्या पर्थच्या प्राणिसंग्रहालयात सोमवारी दयामरण देण्यात आले.
कॅनबेरा : इंडोनशियाच्या सुमात्रा बेटावर आढळणाऱ्या ओरांगउटांग वानराच्या प्रजातीपैकी जगातील सर्वात वयोवृद्ध म्हणून ओळखल्या जाणा-या ‘पुआन’ या मादीला आॅस्ट्रेलियाच्या पर्थच्या प्राणिसंग्रहालयात सोमवारी दयामरण देण्यात आले. जंगली ओरांगउटांग सुमारे ५० वर्षे जगतात. परंतु ‘पुआन’ ६२ वर्षे जगली. या प्रजातीचे सर्वात वयोवृद्ध वानर म्हणून ‘गिनीज बूका’त पुआनची दोनच वर्षांपूर्वी नोंद झाली होती. (वृत्तसंस्था)
>कोण होती ही पुआन?
सुमात्रा बेटावरील जंगलात १९५६ मध्ये पुआनचा जन्म झाला. तेथून तिला मलेशियात ठेवले गेले. मलशियाने १९६८ मध्ये पुआन भेट म्हणून आॅस्ट्रेलियास दिली. तेव्हापासून ती प्राणिसंग्रहालयात होती. पुआन ‘ग्रँड
ओल्ड लेडी’ म्हणून ओळखली जायची. ओरांगउटांग प्रजाती वाचविण्यासाठी कृत्रिम प्रजनन करण्यात पुआन प्रमुख जननी होती. कृत्रिम प्रजनन कार्यक्रमात तिने ११ अपत्यांना जन्म दिला. मुले-बाळे मिळून पुआनचे ५६ वारस अमेरिका, युरोप व अन्य देशांमध्ये आहेत. पुआनच्या काही वारसांना पुन्हा सुमात्राच्या जंगलात सोडण्यात आले. तिचा भागीदार ‘त्सिंग त्सिंग’चा गेल्याच वर्षी मृत्यू झाला.
>का दिले दयामरण?
वृद्धत्वामुळे थकलेल्या पुआनला
उठता-बसताही येत नव्हते व खाणपिणेही बंद होते. अशा अवस्थेत खितपत पडावे लागू नये म्हणून पशुवैद्यकांनी तिला इंजेक्शनने दयामरण दिले.
जागतिक वन्य प्राणी निधीने ओरांगउटांग ही वानराची विलुप्त होण्याचा धोका असलेली प्रजाती म्हणून जाहीर केली आहे. या प्रजातीचे १४,६०० ओरांगउटांग वानर शिल्लक आहेत.
> भावपूर्ण आदरांजली
पुआनला चिरनिद्रा देताना प्राणिसंग्रहालयातील कर्मचाºयांचे उर भरून आले व डोळे पाणावले. प्राणिसंग्रहालयाच्या प्रमुख मार्टिना हार्ट यांचा पुआनला आदरांजली वाहणारा मृत्यूलेख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाला. त्यात हार्ट यांनी लिहिले, ‘वाढत्या वयानुसार पुआनच्या डोळ््याच्या पापण्याही पिकल्या, हालचाल मंदावली व तिचे मन अस्थिर झाले. तरीही आदरणीय ‘आजीबाई’च राहिली.
मानसन्मान हा तिचा हक्क होता व आम्ही सर्वांनी तो तिला भरभरून दिला. पुआनच्या सहवासात राहून मी संयम शिकले. बंदिवासात असतानाही वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक जंगली चित्तवृत्ती मारता येत नाहीत, हे तिने शिकविले. आम्ही तिला पिंजºयात ठेवले, पण पुआनने स्वत:चे स्वातंत्र्य कधीच गमावले नाही!