लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानवर प्रहार... मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:44 PM2023-06-23T12:44:27+5:302023-06-23T12:45:00+5:30
Narendra Modi in US: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकन संसदेतील संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकन संसदेतील संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केले. त्यांनी आर्थिक विकास, कोरोना लसीकरण आणि महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात भारताने मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला. तसेच भारत आणि अमेरिका हे समुद्रापासून अंतराळापर्यंत, व्यवसाय, कृषी, वित्त, कला आणि AI, आरोग्य या क्षेत्रात मिळून काम करत आहेत, असेही मोदींनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी.
लोकशाही आमचा आत्मा
व्हाइट हाऊसमध्ये एका महिला पत्रकाराने मुस्लिम अल्पसंख्यांकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी सांगितले की, केवळ लोक म्हणत नाहीत तर भारतात लोकशाही आहे. भारत आणि अमेरिका दोघांच्याही डीएनएमध्ये लोकशाही आहे. भारतात धर्म, जात यांच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. मुस्लिमांना कुठल्याही शासकीय योजनेपासून वंचित ठेवले जात नाही.
भारतात भेदभाव नाही
लोकशाहीमध्ये जात, पंथ, धर्म, लिंग अशा कुठल्याही गोष्टींवरून भेदभाव स्थान नसते. जेव्हा तुम्ही लोकशाहीबाबत बोलता तेव्हा जर मानवी मूल्य नसतील. मानवता नसेल तर ती लोकशाही असू शकत नाही. जेव्हा तुम्ही लोकशाहीचा स्वीकार करता तेव्हा इतर बाबींना स्थान राहत नाही. त्यामुळे भारत सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास या मुलभूत सिद्धांतासोबत चालतो
पाकिस्तानला इशारा
भारत आणि अमेरिका दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधातील लढाईत एकत्र उभे आहेत. दहशतवादाविरोधात कारवाई आवश्यक आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी प्रभावी कारवाई होण्याची गरज आहे.
मोदींनी ऐकवली आपली कविता
मोदींनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले. यावेळी त्यांनी हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे सांगितले. यावेळी मोदींनी स्वतः रचलेल्या एका कवितेचा उल्लेख केला. असमान मे सिर उठाकर घने बादलों को चिरकर, रोशनी का संकल्प लें, अभी तो सूर्य उगा है. दृढ निश्चय के साथ चलकर, हर मुश्कील को पार कर, घोर अंधेरे को मिटाने, अभी तो सूर्य उगा है.
युक्रेन युद्धावर चर्चेने तोडगा आवश्यक
जागतिकीकरणाचं एक मोठं नुकसान म्हणजे सप्लाय चेन मर्यादित झाली आहे. ही सप्लाय चेन लोकशाहीवादी असावी यासाठी आपण एकत्र मिळून प्रयत्न करणार आहोत. तंत्रच संरक्षण आणि आनंद निश्चित करेल. युक्रेन युद्धामुळे युरोपवर युद्धाचं संकट वाढलं आहे. यामध्ये अनेक शक्ती सहभागी आहेत. मी स्पष्टपणे सांगतो की, हा युद्धाचा काळ नाही आहे तर चर्चा आणि मुत्सद्देगिरीचा काळ आहे. लोकांना होत असलेल्या वेदना आपण मिळून थांबवल्या पाहिजेत.
दहशतवादा मानवतेचा शत्रू
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही तणावाचा परिणाम दिसत आहे. ९/११ चा हल्ला असो वा २६/११ चा हल्ला असो, यानंतर आपल्यासाठी दहशतवादा हा चिंतेचा विषय ठरलेला आहे. या हल्ल्याच्या एक दशकानंतरही कट्टरतावाद आणि दहशतवाद संपूर्ण जगासाठी एक गंभीर धोका बनलेला आहे. या विचारसरणी नवी ओळख आणि रूप घेत असतात. मात्र त्यांचे इरादे तेच आहेत. दहशतवाद मानवतेचा शत्रू आहे. तसेच त्याचा सामना करण्यामध्ये कुठलाही किंतु परंतु बाळगता कामा नये.
भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल
भारतात २५०० पेक्षा अधिक राजकीय पक्ष आहेत. विविध राज्यांमध्ये सुमारे वेगवेगळे २० पक्ष सत्तेवर आहेत. आमच्या २२ अधिकृत भाषा आहेत. हजारो बोलीभाषा आहेत. मात्र तरीही आम्ही एका सूरातच बोलतो. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आम्ही तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू.
भारतात स्वस्तात झाली इंटरनेट क्रांती
गेल्या ९ वर्षांमध्ये एक अब्ज लोकांना तंत्राशी जोडण्याच आलं आहे. १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येत आहेत. ८५ कोटी लोकांना डीबीटीमधून थेट पैसे मिळत आहेत. भारतामध्ये स्वस्तातील इंटरनेट ही मोठी क्रांती आहे. तंत्रज्ञानामुळे समाज परस्परांशी जोडला गेला आहे. इंटरनेटचा फायदा प्रत्येक भारतीयाला मिळत आहे.
भारतामध्ये सर्वाधिक महिला पायलट
आम्ही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना चालवत आहोत. भारतामध्ये ५० कोटी लोकांसाठी मोफत आरोग्य योजना राबवली जात आहे. जनधन योजनेतून ५० कोटी लोकांना फायदा झाला आहे. भारतामध्ये २०० कोटी कोरोनावरील लसी तयार झाल्या. आजच्या भारतात महिलांची स्थिती सुधारली आहे. देशाच्या सैन्यदलांमध्येही महिलांची भागीदारी वाढली आहे. सर्वाधिक महिला पायलट हे भारतात आहेत. भारतात १५ महिला निवडलेल्या प्रतिनिधी आहेत.
महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर यांच्या विचारांचा प्रभाव
भारत आणि अमेरिका हे दोन्ही महान लोकशाहीवादी देश आहेत. लोकशाहीमुळे दोन्ही देशांमध्ये दृढ संबंध आहेत. अमेरिकेच्या स्वप्नांमध्ये भारतीयांचंही योगदान आहे. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर यांचा प्रबाव आहे. अनेक वर्षे दोन्ही देशांनी एकमेकांना प्रभावित केले आहे.