मेस्सीचे पुतळे जाळण्याच्या पॅलेस्टीनच्या धमकीनंतर फिफाचा इस्रायलला हिसका!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 11:56 AM2018-06-07T11:56:11+5:302018-06-07T11:56:11+5:30
हा सामना होऊ घातलेले स्टेडियम 1948 साली इस्रायलच्या निर्मितीवेळच्या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी गावाच्या जागेवर तयार करण्यात आले आहे.
पॅलेस्टिनी संघटनांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना व इस्रायल यांच्यातील सराव सामना रद्द करण्यात आला आहे. येत्या शनिवारी जेरुसलेम येथील टेडी कोलेक स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार होता. मात्र, पॅलेस्टिनी संघटनांनी या सामन्याला तीव्र विरोध केला होता. अर्जेंटिनाने हा सामना खेळू नये. त्यांनी हा सामना खेळल्यास अरब देशांनी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी याचे पुतळे जाळावेत, असे आवाहन पॅलेस्टिनी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष जिब्रिल राजौब यांनी केले होते.
याशिवाय, हा सामना होऊ घातलेले स्टेडियम 1948 साली इस्रायलच्या निर्मितीवेळच्या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी गावाच्या जागेवर तयार करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पॅलेस्टिनी संघटनांकडून अर्जेंटिना आणि इस्रायल सामन्याला सातत्याने विरोध सुरू होता. या संघटनांनी फिफाकडेही आपली मागणी लावून धरली होती. यावेळी पॅलेस्टिनी खेळाडुंच्या प्रवासावर इस्रालयने घातलेल्या निर्बंधांकडेही या संघटनांनी लक्ष वेधत, इस्रायलला आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेतून बाहेर काढावे, अशी मागणी ते बऱ्याच काळापासून करत आहेत. हा सामना रद्द न केल्यास या संघटना आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी अर्जेंटिनाचा सराव सुरु असलेल्या बार्सिलोनातील क्रीडा संकुलाबाहेर निदर्शने करणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर अर्जेंटिनाचा खेळाडू गोंझालो ह्युग्वेने याने, अखेर योग्य निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.