...तर मेसीला २२ महिने तुरुंगवासाची शिक्षा
By admin | Published: May 30, 2016 09:42 AM2016-05-30T09:42:10+5:302016-05-30T09:42:10+5:30
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लायोनेल मेसी विरोधात मंगळवारपासून स्पेनच्या बार्सिलोना शहरात खटला सुरु होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बार्सिलोना, दि. ३० - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लायोनेल मेसी विरोधात मंगळवारपासून स्पेनच्या बार्सिलोना शहरात खटला सुरु होणार आहे. जगातील सर्वात महागडा फुटबॉल खेळाडू असणा-या मेसीवर कर घोटाळयाचा आरोप आहे. मेसी आणि त्याचे वडील दोषी आढळले तर, त्यांना २२ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय जितक्या रक्कमेच कर टाळला आहे तितकी रक्कम दंड म्हणून ठोठावली जाऊ शकते.
मेसीने चाळीस लाख युरोचा कर भरण्याचे टाळून स्पेनची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दोन जूनपर्यंत खटल्याची सुनावणी चालणार असून, दोन जूनलाच मेसी आणि त्याच्या वडिलांची याप्रकरणी कोर्टात साक्ष नोंदवण्यात येईल.
अमेरिकेत होणारी कोपा अमेरिका स्पर्धा तोंडावर आलेली असताना मेसीला न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. अर्जेंटिनाचा सहा जूनला पहिल्या फेरीत गतविजेत्या चिली विरुद्घ सामना होणार आहे. मेसी आणि त्याचे वडिल जॉर्ज मेसी यांनी कर टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या साखळीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २००७-०९ मध्ये मेसीने त्याचे इमेज राईट विकले होते त्यातून मिळालेल्या उत्पन्नात कर चुकवेगिरीचा आरोप आहे.