...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 08:53 AM2022-02-07T08:53:23+5:302022-02-07T08:55:37+5:30

नियम, कायद्याच्या जंजाळात अडकलेल्या मेटाकडून फेसबुक, इन्स्टाग्राम बंद करण्याची तयारी सुरू

Meta threatens to shut down Facebook and Instagram in Europe | ...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी

...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी

Next

मुंबई: फेसबुक, इन्स्टाग्रामची मालक कंपनी असलेल्या मेटासमोरची आव्हानं वाढली आहे. एका बाजूला फेसबुकच्या डेली युजर्सच्या संख्येत ५ लाखांनी घट झाली. त्यामुळे मेटाचं मूल्य १५ लाख कोटी रुपयांनी कमी झालं. शेअर्सचे भाव २० टक्क्यांनी खाली आले. त्यात आता युरोपमध्ये मेटाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तिथे कंपनी आपल्या काही सेवा बंद करू शकते.

कंपनीला आपल्या वापरकर्त्यांचा तपशील अमेरिकास्थित सर्व्हरमध्ये हलवण्याचा, साठवण्याचा आणि प्रक्रिया करण्याचा पर्याय न मिळाल्यास युरोपमधील फेसबुक, इन्स्टाग्राममधील सेवा बंद करावी लागू शकते, असं मेटानं आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. युरोपात सध्या माहिती हस्तांतरित करण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. आतापर्यंत कंपन्यांना प्रायव्हसी शील्ड आणि दुसऱ्या मॉडल कराराच्या माध्यमातून माहिती हस्तांतरित करण्याचा पर्याय मिळत होता. याच्याच मदतीनं मेटाकडून युरोपीय वापरकर्त्यांची माहिती अमेरिकन सर्व्हरवर साठवली जात होती. मात्र आता या कायद्याला मान्यता नाही.

नियमांची नवी चौकट तयार करण्यात आली नाही किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या मॉडेलचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली नाही तर कंपनी युरोपमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सेवा देऊ शकणार नाही, असं मेटानं यूएस सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशनला एका अहवालाच्या माध्यमातून सांगितलं आहे. याआधी कंपन्या प्रायव्हसी शील्ड कायद्याचा वापर करून युरोपियन नागरिकांची माहिती अमेरिकेतील सर्व्हरवर हलवायच्या. मात्र जुलै २०२० मध्ये युरोपियन न्यायालयानं हा कायदा रद्द केला.

प्रायव्हसी शील्डसोबतच मेटाकडून युरोपियन वापरकर्त्यांची माहिती अमेरिकन सर्व्हरवर साठवण्यासाठी स्टँडर्ड काँट्रॅक्टच्युएल क्लॉसेसचा वापर केला जायचा. मात्र आता हे मॉडल ऍग्रीमेंटदेखील ब्रसेल्ससह युरोपातील अनेक भागांत चौकशीच्या फेऱ्यात अडकलं आहे. त्याबद्दल तपास सुरू आहे. त्यामुळे मेटासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: Meta threatens to shut down Facebook and Instagram in Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.