मॅक्सिकोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत 248 लोक मृत्युमुखी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 04:47 AM2017-09-20T04:47:54+5:302017-09-20T14:40:45+5:30
मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरली. या भूकंपात आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे.
मॅक्सिको, दि. 20 - मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरली. या भूकंपात आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मॅक्सिकोमधील स्थानिक प्रशासनाच्या हवाल्यानं एपी या वृत्तसंस्थेनं दिली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे.
या भूकंपाच्या दुर्घटनेनंतर मॅक्सिकोमधील लोक रस्त्यावर उतरून सैरावैरा पळत आहेत. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. तसेच या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही त्यांनी दिली आहे. मोरेलोस प्रांताच्या राज्यपालांनी भूकंपात आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच मॅक्सिको महापौरांनीही भूकंपात 8 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.
विध्वंसक भूकंपानं इमारती कोसळल्या असून, ढिगा-याखाली अनेक लोक दबल्याची भीतीही मॅक्सिकोच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. भूकंपामुळे राजधानीतील एल सेंट्रो व रोमा जिल्ह्यांत जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगा-याखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच ढिगा-यांखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी बचावपथकही घटनास्थळी दाखल झालंय. परंतु बचावकार्य राबवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
BREAKING: Civil Defense agency says Mexico earthquake death toll reaches 139.
— The Associated Press (@AP) September 20, 2017
भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मॅक्सिकोच्या दक्षिणेकडच्या भागात झालेल्या भूकंपात 90 लोकांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मॅक्सिकोमध्ये 1985मध्ये झालेल्या भूकंपाच्या 32 वर्षांनंतर त्याच दिवशी मॅक्सिको सिटी पुन्हा एकदा विध्वंसक भूकंपानं हादरली आहे. 1985साली मॅक्सिकोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.