मेक्सिको-अमेरिकेतील वाद शिगेला, ट्रम्प यांचा मेक्सिकोला इशारा
By admin | Published: January 27, 2017 04:37 AM2017-01-27T04:37:06+5:302017-01-27T06:43:36+5:30
26 जानेवारी रोजी मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी ट्रम्पसोबतची बैठक रद्द केल्याचं ट्विट केलं. त्यानंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोबाबत आक्रमक पवित्रा घेतला
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 27 - अमेरिका आणि मेक्सिको या देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. 31 जानेवारी रोजी मेक्सिकोचे राष्ट्रपती एन्रिक पेना नीटो आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होणार होती. मात्र, गुरूवारी मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी बैठक रद्द केल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अमेरिकेत बाहेर देशातून येणारे लोंढे थांबवण्याच्या बाजूचे ट्रम्प आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारसभांमध्येही त्यांनी वेळोवेळी याबाबत भाष्य केलं होतं. त्यानुसार राष्ट्रपतीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी येणा-या खर्चात मेक्सिकोने हातभार लावण्याची मागणी केली. त्यानंतर नीटो यांनी "मेक्सिको भिंतींवर विश्वास ठेवत नाही. कोणत्याही प्रकारची भिंत बांधण्यास पैसे देणार नाही, हे मी वारंवार सागितलं आहे. भिंत बांधण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा मी विरोध करतो" अशा आशयाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.
त्यावर, 'जर मेक्सिको भिंत बांधण्यासाठी पैसे देणार नसेल तर, मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी त्यांचा वॉशिंग्टन दौरा रद्द करावा' असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं. त्याला उत्तर देत मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी 26 जानेवारीला ट्रम्पसोबतची बैठक रद्द करण्याचं ट्वीट केलं. या ट्विटनंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं वृत्त आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत आयात होणा-या वस्तूंवर 20 टक्के कर आकारण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.
20 टक्के कर आकारण्याचा ट्रम्प यांचा विचार असून तसा प्रस्ताव त्यांनी दिला आहे असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे. कर स्वरूपात आकारण्यात येणारी 20 टक्के रक्कम सीमेवर भिंत बांधण्यात खर्च करण्यात यावी असा ट्रम्प यांचा विचार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या मीडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.
20 टक्के कर आकारण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेमुळे दोन देशातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हं आहेत.