भारताला मेक्सिकोचा पाठिंबा

By admin | Published: June 10, 2016 04:05 AM2016-06-10T04:05:23+5:302016-06-10T04:05:23+5:30

आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोने गुरुवारी पाठिंबा दिला.

Mexico supports India | भारताला मेक्सिकोचा पाठिंबा

भारताला मेक्सिकोचा पाठिंबा

Next


मेक्सिको सिटी : आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोने गुरुवारी पाठिंबा दिला. ४८ देश सदस्य असलेल्या एनएसजीचे खुले अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोचा पाठिंबा महत्त्वाचा आहे.
या गटातील सदस्य देश आपापसांत अणू तंत्रज्ञानाचा व्यापार व निर्यात करू शकतात. मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निएतो यांनी एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. त्या आधी मोदी आणि निएतो यांच्यामध्ये द्विपक्षीय आणि जागतिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोचा सकारात्मक आणि विधायक पाठिंबा असल्याचे निएतो यांनी मोदी यांच्यासोबत घेतलेल्या परिषदेत सांगितले.
मोदी यांनी मेक्सिकोने पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये मेक्सिको महत्त्वाचा भागीदार असल्याचे
म्हटले. केवळ खरेदी करणारे आणि विकणारे देश एवढ्या नात्यापलीकडे जाऊन आम्ही दीर्घकाळची भागीदारी निर्माण करण्याचे बघत आहोत, असे मोदी या वेळी म्हणाले.
मोदी आणि निएतो यांच्यातील भेटीमध्ये व्यापार, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, हवामान बदल आणि ऊर्जा या क्षेत्रांसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत व्यापक सहकार्य करण्यावर चर्चा झाली.
मेक्सिको एनएसजीचा महत्त्वाचा सदस्य असल्यामुळे त्याने भारताला दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्व आहे. भारताच्या या प्रयत्नांना सदस्य देश स्वित्झर्लंड व अमेरिकेनेही पाठिंबा दिला आहे.
भारताच्या एनएसजीचे सदस्यत्व मिळविण्यासाठीच्या प्रयत्नांना चीन विरोध करीत आहे. अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) भारताने स्वाक्षरी केली नसल्यामुळे भारताला सदस्यत्व देऊ नये, अशी चीनची भूमिका आहे. मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता.
अण्वस्त्रे प्रसारासाठीचा भारताचा जो प्रवास आहे, त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि एनएसजीच्या इतर सदस्यांनी त्याच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे. एनएसजीचे कामकाज हे एकमताने चालते. एकाही सदस्य देशाने विरोध केला, तर भारताचे प्रयत्न अपयशी ठरतील. सदस्यत्वासाठी भारत गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत असून, त्यासाठीचा औपचारिक अर्ज त्याने गेल्या १२ मार्च रोजी दिला. (वृत्तसंस्था)
>रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी भोजन
विशेष आदरतिथ्य म्हणून निएतो हे स्वत: कार चालवत, मोदी यांना भोजनासाठी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटरद्वारे सांगितले. त्यांनी त्यासोबत फोटोही पोस्ट केला. त्यात निएतो कार चालवित असून, त्यांच्या शेजारी मोदी बसलेले दिसतात. ‘क्विंटोनिल’ नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी शाकाहारी जेवण घेतले.
मोदी मायदेशी रवाना
मेक्सिकोच्या छोट्याशा भेटीनंतर पाच देशांचा दौरा आटोपून मोदी गुरुवारी मायदेशी रवाना झाले. या दौऱ्यात ते अमेरिका, कतार, स्वित्झर्लंड आणि अफगाणिस्तानलाही गेले होते.
मेक्सिकोचे आभार
‘भारत-मेक्सिको यांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आणि या नात्याचा आमच्या देशाच्या लोकांना आणि संपूर्ण जगाला लाभ होईल’, असे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. मोदींचा दौरा ४ जून रोजी सुरू झाला होता.

Web Title: Mexico supports India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.