लादेन फक्त इंजिनियर नव्हता, तसा हरदीप केवळ प्लंबर नव्हता; अधिकाऱ्याचा अमेरिकेलाच घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 04:53 PM2023-09-23T16:53:51+5:302023-09-23T16:54:49+5:30
Canada-India Clashes: हरदीप सिंग निज्जर प्रकरणात जस्टिन ट्रुडोंनी भारताशी वाद ओढवून घेणे हे मुंगीने हत्तीशी वैर करण्यासारखे होईल, असे अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
Canada-India Clashes: खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला. यानंतर कॅनडावर यासंबंधीचे पुरावे देण्याचा दबाव सातत्याने वाढत आहे. यातच अमेरिकेने कॅनडाची बाजू घेतली असून, भारताला कोणतीही विशेष सूट मिळणार नाही. भारताने तपासात सहकार्य केले पाहिजे, अशी भूमिका मांडली. मात्र, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक व माजी उच्चपदस्थ अधिकारी मायकेल रुबिन यांनी अमेरिकन सरकारला घरचा आहेर दिला आहे. ओसामा बिन लादेन फक्त इंजिनियर नव्हता, तसा हरदीप सिंह निज्जर हा केवळ प्लंबर नव्हता. जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली आहे, असे रुबिन यांनी म्हटले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांवरून सध्या जागतिक स्तरावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणी जस्टिन ट्रुडो यांनी केलेले आरोप गंभीर असून भारताने तपासात कॅनडाला तपास यंत्रणांना सहकार्य करावे. देश कोणताही असला तरी न्यायाच्या व सार्वभौमत्वाच्या तत्वाशी तडजोड करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेने घेतली आहे. यावर रुबिन यांनी भारताची बाजू घेत, अमेरिका आणि कॅनडाला चांगलेच सुनावले.
पंतप्रधान ट्रुडोंनी फार मोठी चूक केली
पंतप्रधान ट्रुडोंनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी भारतावर केलेल्या आरोपांचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत. एक तर ते हवेत गोळीबार करत आहेत किंवा या प्रकरणात खरेच तथ्य असेल. पण काहीही असले तरी जस्टिन ट्रुडो यांना हे सांगावेच लागेल की त्यांनी रक्तपात केलेल्या एका दहशतवाद्याला कॅनडामध्ये आश्रय का दिला होता, असा सवाल करताना, या सगळ्या वादामध्ये मोठा धोका भारतापेक्षा कॅनडालाच जास्त आहे. जर कॅनडाने भारताशी वाद ओढवून घेतलाच, तर या घडीला हे एखाद्या मुंगीने हत्तीशी वैर करण्यासारखे होईल, असे रुबिन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही
भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे, हे सत्य नाकारता येत नाही. जागतिक स्तरावर भारत धोरणात्मकदृष्ट्या कॅनडापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा आहे. चीनचे आव्हान व दक्षिण आशियातील इतर समस्यांचा विचार करता भारत महत्त्वाचा आहे, असे रुबिन यांनी नमूद केले.
लादेन फक्त इंजिनियर नव्हता, तसा हरदीप केवळ प्लंबर नव्हता
आपण स्वत:चीच फसवणूक करण्यात काहीही अर्थ नाही. हरदीप सिंग निज्जर काही फक्त एक प्लंबर नव्हता. तसे म्हटले तर ओसामा बिन लादेन फक्त एक इंजिनियर नव्हता. निज्जरने केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठा रक्तपात झाला होता, असे रुबिन यांनी सांगितले. अमेरिका इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. पण तसे करताना आपण दुतोंडी भूमिका घेत आहोत. कारण इथे आपण दोन देशांच्या सार्वभौमत्वाबाबत बोलत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या दहशतवादाबाबत बोल आहेत. अमेरिकेने कासिम सुलेमानी व ओसामा बिन लादेनबाबत जे केले, तेच भारताने हरदीप सिंग निज्जरच्या बाबतीत केल्याचा दावा केला जात आहे, असे मायकल रुबिन यांनी म्हटले आहे.