बिल गेट्स यांच्याकडून भारताची स्तुती, म्हणाले...भारतामुळे आज जगभरात लहान मुलांना मिळतेय लस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:19 PM2022-02-23T17:19:24+5:302022-02-23T17:19:51+5:30
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भारताच्या लस निर्मितीच्या कौशल्याची तोंडभरुन स्तुती करताना वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. जगभरात अनेक देशांसाठी स्वस्तात कोरोना विरोधी लस निर्माण केल्याच्या भारताच्या प्रयत्नांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, असं बिल गेट्स म्हणाले.
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भारताच्या लस निर्मितीच्या कौशल्याची तोंडभरुन स्तुती करताना वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. जगभरात अनेक देशांसाठी स्वस्तात कोरोना विरोधी लस निर्माण केल्याच्या भारताच्या प्रयत्नांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, असं बिल गेट्स म्हणाले. वॉश्गिंटन स्थित भारतीय दूतावासाकडून भारत-अमेरिका आरोग्य कराराच्या पार्श्वभूमीवर एक व्हर्च्युअल गोलमेज परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेला बिल गेट्स उपस्थित होते. गेल्या वर्षभरात भारतानं जवळपास १०० हून अधिक देशांना कोरोना विरोधी लसीचे १५ कोटींहून अधिक डोस उपलब्ध करुन दिले आहेत, असं गेट्स यावेळी म्हणाले.
"भारताच्या लस निर्मात्यांचे आभार व्यक्त करायला हवेत. जगभरातील जवळपास प्रत्येक देशातील लहान मुलं आता निमोनिया आणि रोटाव्हायरस सारख्या रोगांपासून सुरक्षित आहेत व लस घेता येत आहे. गेल्या अनेक दशकांपासून या रोगांमुळे लहान मुलं बळी पडत होती", असं बिल गेट्स म्हणाले. जगभरात स्वस्तात लस निर्मिती आणि पुरवठ्याबाबत द्विपक्षीय कराराचा लाभ घेण्यासाठी भारत व अमेरिकेच्या प्रमुख हितचिंतकांना सोबत घेणं हाच या गोलमेज परिषदेचा उद्देश होता.
"कोरोना व्हायरसची महामारी अद्याप संपुष्टात आलेली नाही. पण आपण आपत्कालीन प्रतिक्रियेच्या पुढे जाऊन आता विचार करायला सुरुवात केली आहे. याचं उद्दीष्ट केवळ कोरोना महामारीला लगाम घालणं नसून भविष्यात अशा प्रकारची महामारी निर्माण होणार नाही यासाठी तयार राहणं हे आहे. तसंच सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या सर्व रोगांविरोधातील लढाई सुरू ठेवणं गरजेचं आहे", असंही बिल गेट्स म्हणाले.