मायक्रोसॉफ्ट करणार कर्मचाऱ्यांची कपात
By admin | Published: July 18, 2014 01:57 AM2014-07-18T01:57:22+5:302014-07-18T01:57:22+5:30
सॉफ्टवेअर निर्मितीमधील जगातील दिग्गज कंपनी मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या ताफ्यातील तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे
सिएटल : सॉफ्टवेअर निर्मितीमधील जगातील दिग्गज कंपनी मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या ताफ्यातील तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञान कंपन्यांत अलीकडच्या काळात होणारी ही सर्वात मोठी नोकर कपात आहे. तर कंपनीच्या ३९ वर्षांच्या इतिहासातही ही सर्वात मोठी नोकर कपात मानली जात आहे.
कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, अलीकडेच मायक्रोसॉफ्टने नोकिया या एकेकाळी मोबाईल हँडसेट क्षेत्रात दादा असलेल्या कंपनीचा ताबा घेतला होता. यानंतर नोकियाचे सुमारे २५ हजार कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले.
यामुळे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख २७ हजार इतकी झाली आहे.
नोकियाचा ताबा मिळविण्यासाठी खर्ची पडलेली रक्कम आणि आगामी काळात व्यवसाय करण्यासाठी लागणारा पैसा आणि आता या वाढीव २५ हजार कर्मचाऱ्यांचा पडणारा बोजा लक्षात घेत ही कपात होत असल्याचे कंपनीने म्हणणे आहे.
यातही, मायक्रोसॉफ्ट आणि नोकिया या दोन्ही कंपन्यांत एकसारख्या स्वरुपाचे काम करणारे हे कर्मचारी असून, पहिल्या टप्प्यात सिएटल येथील १३५१ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)