गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 06:56 PM2023-10-12T18:56:19+5:302023-10-12T18:57:01+5:30

इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीरियावरील हा पहिला हल्ला असल्याचे सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलने म्हटले आहे. 

middle east israel airstrike syria airports after hamas war | गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव

गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. यानंतर गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे. गुरुवारी इस्त्रायलचे हल्ले आणखी भयावह झाले, जेव्हा त्यांच्या लढाऊ विमानांनी सीरियातील दोन मुख्य विमानतळांवर हवाई हल्ले केले. इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीरियावरील हा पहिला हल्ला असल्याचे सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलने म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने दमास्कस आणि अलेप्पो विमानतळावर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे अलेप्पो आणि राजधानी दमास्कसच्या विमानतळावर उड्डाणे थांबवावी लागली आहेत. दोन्हीवर युद्धग्रस्त सीरियन सरकारचे नियंत्रण आहे. दरम्यान, सहाव्या दिवशी हमास आणि इस्रायल यांच्यात जोरदार गोळीबार सुरू असतानाच हे हल्ले झाले. शनिवारी शेकडो हमास दहशतवाद्यांनी गाझा सीमा ओलांडून इस्रायलवर हल्ला केला आणि एक हजाराहून अधिक नागरिकांचा बळी घेतला. हे हल्ले अशावेळी झाले आहेत, जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. 

दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी सीरियाचे समकक्ष बशर अल-असद यांच्याशी दूरध्वनी करून अरब आणि इस्लामिक देशांना इस्रायलचा सामना करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सीरियावरील वैयक्तिक हल्ल्यांवर इस्रायल क्वचितच भाष्य करते. मात्र तो आपला कट्टर शत्रू इराणला सीरियात कधीही पाय रोवू देणार नाही, असे इस्रायलने वारंवार सांगितले आहे.

इस्रायल आता समुद्रामार्गे हमासवर हल्ला करणार
हमासशी सामना करण्यासाठी अमेरिकेने जगातील सर्वात मोठी, महागडी आणि हायटेक, शस्त्रास्त्रांनी सुसज्ज युद्धनौका इस्रायलला देण्याचा निर्णय घेतला आहे. 'USS गेराल्ड फोर्ड', असे या युद्धनौकेचे नाव आहे. ही युद्धनौका इस्रायलच्या दिशेने नेण्याचे आदेश अमेरिकन प्रशासनाने दिले आहेत. ही इतकी शक्तिशाली युद्धनौका आहे की, यात एकाच वेळी सुमारे पाच हजार सैनिक, 90 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर वाहून नेता येऊ शकतात. ही युद्धनौका क्षेपणास्त्रांसह अनेक आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे. 

जगातील सर्वात आधुनिक युद्धनौका
अमेरिकेने $ 18 अब्ज खर्च करून तयार केलेली ही आधुनिक युद्धनौका आहे. प्रत्येक बाबतीत ही जगातील कोणत्याही जहाजापेक्षा पुढे असल्याचा दावा केला जातो. ही नौका 337 मीटर लांब, 78 मीटर रुंद आणि 76 मीटर उंच आहे. ही 90 लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते. वजन आणि आकाराने प्रचंड असूनही ही समुद्रात खूप वेगाने फिरते. नौकेचा वेग 56 किलोमीटर प्रति तास इतका आहे, जो समुद्रातील जहाजासाठी एक उत्कृष्ट वेग आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष गेराल्ड आर फोर्ड यांच्या नावावरून या नौकेला हे नाव देण्यात आले आहे. फोर्ड यांनी नौदलाचीही सेवा केली होती, म्हणूनच हे अत्याधुनिक जहाज त्यांना समर्पित करण्यात आले. 
 

Web Title: middle east israel airstrike syria airports after hamas war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.