भीषण! गाझावर विजेचे संकट, रुग्णालयातील जनरेटरचं इंधन संपलं; लोकांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 10:42 AM2023-10-24T10:42:14+5:302023-10-24T10:44:03+5:30

Israel Palestine Conflict : गेल्या काही दिवसांपासून सातहून अधिक रुग्णालये आणि दोन डझन प्राथमिक आरोग्य केंद्रे वीजपुरवठ्याअभावी बंद आहेत. युद्धादरम्यान ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

middle east israel hamas war condition of hospitals in gaza is serious thousands of lives are in danger | भीषण! गाझावर विजेचे संकट, रुग्णालयातील जनरेटरचं इंधन संपलं; लोकांचा जीव धोक्यात

भीषण! गाझावर विजेचे संकट, रुग्णालयातील जनरेटरचं इंधन संपलं; लोकांचा जीव धोक्यात

गाझामध्ये युद्धामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. याच दरम्यान अंगावर काटा आणणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. गाझाच्या अल-अक्सा रुग्णालयातील इनक्यूबेटरमध्ये असलेल्या निष्पाप बाळाचा जागतिक राजकारणाशी काहीही संबंध नाही, परंतु हेच राजकारण त्यांच्या जीवावर भारी पडतं आहे. या रुग्णालयाला जनरेटरवरून वीजपुरवठा केला जात आहे, मात्र प्रत्येक मिनिटाला डिझेलचा साठा कमी होत असून शेकडो रुग्णांच्या जीवाची चिंता वाढत आहे.

गाझा पट्टीतील लाखो निष्पाप लोक युद्धात चिरडले जात आहेत. यामध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या 130 प्रीमॅच्युअर बाळांचाही समावेश आहे. या बाळांना इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाते आणि त्यांचा श्वासोच्छ्वास वीज पुरवठ्यावर अवलंबून असतो. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने गाझा पट्टीला दोन आठवड्यांपासून वेढा घातला असून तेथील वीज, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद केला आहे.

डिझेल आणि पेट्रोल नाही, ज्यामुळे गाझा रुग्णालयातील जनरेटर चालू शकत नाहीत. रुग्णवाहिका सेवा सुरू ठेवण्यात समस्या आहे. गेल्या काही दिवसांपासून सातहून अधिक रुग्णालये आणि दोन डझन प्राथमिक आरोग्य केंद्रे वीजपुरवठ्याअभावी बंद आहेत. युद्धादरम्यान ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे कारण गाझामध्ये इस्रायली बॉम्बस्फोटात दररोज शेकडो लोक जखमी होत आहेत. जखमींची संख्या 15,273 वर पोहोचली आहे. 

ज्या रुग्णालयांमध्ये या जखमींना उपचारासाठी आणले जात आहे, तेथे वीज, पाणी, औषधे आणि साधनसामग्रीची आधीच तीव्र टंचाई आहे. अशा स्थितीत गाझा येथील रुग्णालयांची अवस्था प्रत्येक क्षणाला गंभीर होत असून हजारो रुग्ण व जखमींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गाझामधील यूएन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी गंभीर मानवतावादी आपत्तीच्या धोक्याचा इशारा दिला आहे. 

प्रत्येक तासागणिक जिवंत लोकांच्या अडचणी वाढत आहेत, बॉम्बस्फोटाने पडझड झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या दुर्दैवी लोकांकडे कोणाचे लक्ष नाही. बॉम्बस्फोटानंतर लगेचच साध्या साधनांचा वापर करून लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले जात आहे. जीवाच्या भीतीने लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: middle east israel hamas war condition of hospitals in gaza is serious thousands of lives are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.