"गाझामध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायली सैन्य पोहोचलं नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 01:18 PM2023-11-16T13:18:25+5:302023-11-16T14:13:08+5:30
Israel Palestine Conflict : 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्त्रायली पंतप्रधान म्हणाले होते की, आता हमाससाठी कोणतीही जागा सुरक्षित राहणार नाही.
इस्रायली सैन्याने बुधवारी पहाटे गाझामधील अल शिफा या सर्वात मोठ्या रुग्णालयावर कब्जा केला. या घटनेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलचा निषेध केला जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, "गाझामध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायली सैन्य पोहोचलं नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही गाझा शहराच्या बाहेरील भागात पोहोचणार नाही आणि आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही अल-शिफा रुग्णालयात प्रवेश करणार नाही आणि आम्ही तसं केलं."
7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्त्रायली पंतप्रधान म्हणाले होते की, आता हमाससाठी कोणतीही जागा सुरक्षित राहणार नाही. अल-शिफा हॉस्पिटलमध्ये इस्रायली लष्कराच्या कारवाईनंतर इस्रायलने हमासच्या विरोधात अचूक कारवाई करत असल्याचं सांगितलं. छाप्यादरम्यान रुग्णालयात 2,300 रुग्ण, कर्मचारी आणि विस्थापित पॅलेस्टिनी होते असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे.
वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने हमासवर गाझा रुग्णालयांमध्ये दहशतवादी हल्ले करणे, ओलीस लपवणे आणि मानवी ढालीसारखे रुग्णांचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलवरील हल्ल्यासाठी हमासने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना जबाबदार धरलं आहे. हमासने म्हटलं आहे की, व्हाईट हाऊस आणि पेंटागॉन खोटे दावा करत आहेत की हॉस्पिटल कॉम्प्लेक्सचा वापर लष्करी मोहिमेसाठी आणि हल्ल्यांसाठी केला जात आहे.
आम्ही वैद्यकीय कर्मचारी, जखमी, आजारी लोकं, वेळेआधी जन्मलेली मुलं, विस्थापितांचं जीवन आणि सुरक्षिततेसाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे. हमास या दहशतवादी संघटनेने गाझातील सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफा इस्रायली लष्कराच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. इस्रायली सैन्याने बुधवारी पहाटे अल-शिफा हॉस्पिटल कॉम्प्लेक्सता ताबा घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.