पाकिस्तानात मध्यरात्री मोठी घडामोड; राष्ट्रपतींनी केली संसद भंग, सरकार बरखास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:44 AM2023-08-10T08:44:36+5:302023-08-10T08:45:31+5:30
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राष्ट्रपती अल्वी यांना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारस केली होती
नवी दिल्ली – पाकिस्तानात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीत मध्यरात्री अचानक संसद बरखास्त करण्यात आली आहे. आगामी ३ महिन्यात पाकिस्तानात पुन्हा निवडणुका घेण्यात येतील असे बोलले जात आहे. त्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान निवडणुकीत उभे राहणार का हा खरा प्रश्न आहे. कारण ७० वर्षीय इमरान खान सध्या पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत. तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना ३ वर्षांची शिक्षा झाली आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यावरून बुधवारी संसद भंग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानातील लोकसभा कार्यकाळ ५ वर्षाचा पूर्ण होण्याच्या ३ दिवस आधीच संसद भंग केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. संसद भंग करण्याच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलंय की, नॅशनल असेंबली संविधानाच्या कलम ५८ अंतर्गत भंग करण्यात येत आहे. संसदेचा ५ वर्षाचा कार्यकाळ अधिकृतपणे १२ ऑगस्टला संपणार होता.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राष्ट्रपती अल्वी यांना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारस केली होती. कलम ५८ अंतर्गत जर राष्ट्रपतींनी संसद भंग करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या शिफारशीनंतर ४८ तासांत संसद भंग केली नाही तर आपोआप ही संसद भंग होते. संविधानानुसार, शहबाज शरीफ आणि लोकसभेचे गटनेते यांना काळजीवाहू पंतप्रधानाचे नाव देण्यासाठी ३ दिवसांची मुदत आहे. जर काळजीवाहू पंतप्रधानपदाच्या नावावर सहमती बनली नाही तर लोकसभा सभापतींच्या समितीसमोर हा प्रस्ताव जाईल. ही समिती ३ दिवसांत काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल.
صدر مملکت ڈاکٹر عارف علوی نے قومی اسمبلی تحلیل کر دی
— The President of Pakistan (@PresOfPakistan) August 9, 2023
صدر مملکت نے قومی اسمبلی کی تحلیل وزیر ِ اعظم کی ایڈوائس پر آئین کے آرٹیکل 58 ایک کے تحت کی pic.twitter.com/B7kGkMWLEh
इमरान यांना ५ वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी
इमरान खान यांच्यावर निवडणूक आयोगाने ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानी निवडणूक आयोगाने इमरान खान यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. इमरान यांनी खालच्या कोर्टाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान दिले आहे.