ओळख मिळाल्याचा मध्यरात्री जल्लोष
By admin | Published: August 2, 2015 01:05 AM2015-08-02T01:05:43+5:302015-08-02T01:05:43+5:30
तब्बल ७० वर्षांनंतर आपला देश आणि देशबांधवांचा सहवास मिळाल्याच्या आनंदाच्या जल्लोषाने शुक्रवारची मध्यरात्र हरखून गेली. ना राष्ट्र ना राष्ट्रीयत्वाची ओळख, तसेच शाळा, दवाखाना आणि वीज
ढाका : तब्बल ७० वर्षांनंतर आपला देश आणि देशबांधवांचा सहवास मिळाल्याच्या आनंदाच्या जल्लोषाने शुक्रवारची मध्यरात्र हरखून गेली. ना राष्ट्र ना राष्ट्रीयत्वाची ओळख, तसेच शाळा, दवाखाना आणि वीज या सुविधांशिवाय जीवन जगणाऱ्या भारत आणि बांगलादेशामधील १६२ वस्त्यांतील लोकांना अखेर स्वत:चे वतन आणि ओळख मिळाल्याने गेल्या सात दशकांपासूनच्या रखडलेल्या सीमा हद्दबंदीची समस्या एकदाची सुटली.
शुक्रवारी मध्यरात्री भारत-बांगलादेश दरम्यान परस्परांच्या हद्दीतील १६२ वस्त्या आणि भू-प्रदेश हस्तांतरणाच्या घटनेने इतिहास घडविला आणि या वस्त्यांत जल्लोषाला उधाण आले.
१७,१६० एकरातील १११ भारतीय वस्त्या बांगलादेशला हस्तांतरित करण्यात आल्या. तसेच बांगलादेशातील ५१ वस्त्या भारतीय हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या.
जवळपास ३७ हजार लोक बांगलादेशातील भारतीय वस्त्यांत राहत होते, तर १४ हजार लोक भारतातील बांगलादेशातील वस्त्यांत राहत होते. गेली ७० वर्षे त्यांनी दु:ख भोगले. आता परस्परांच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांना आपल्या इच्छेनुसार भारतीय किंवा बांगलादेशाचे नागरिकत्व मिळेल. तसेच शैक्षणिक, आरोग्य आणि सरकारी योजना व सुविधांचाही लाभ मिळेल.
भारताचे महाप्रबंधक, बांगलादेशच्या सांख्यिकी विभाग आणि कुच बिहारचे जिल्हा दंडाधिकारी व लालमोनीरघाट, पंचगढ, कुरीग्राम, नीलफामडीच्या उपायुक्तांनी दोन्हीकडच्या लोकांची इच्छा जाणून घेतली. यासाठी ७५ पथके कामाला लागली होती. (वृत्तसंस्था)