मालीमध्ये लष्करी चौकीवरील अतिरेकी हल्ल्यात ५३ सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 06:01 AM2019-11-03T06:01:03+5:302019-11-03T06:01:37+5:30
नायगरच्या सीमेला लागून असलेल्या मेनाका प्रांतात भूसुरुंगाच्या स्फोटात एक नागरिकही ठार झाला आहे
बामको : आफ्रिका खंडातील माली देशाच्या ईशान्य भागात एका लष्करी चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५३ सैनिक ठार झाले आहेत. मालीमध्ये अलीकडच्या काळात इस्लामी अतिरेक्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला ठरला आहे.
नायगरच्या सीमेला लागून असलेल्या मेनाका प्रांतात भूसुरुंगाच्या स्फोटात एक नागरिकही ठार झाला आहे, असे मालीचे जनसंपर्कमंत्री याया संगारे यांनी सांगितले. परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असून, शोध तसेच मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. लष्करी चौकीजवळ १० जण जखमी अवस्थेत आढळून आले आहेत, असे संगारे यांनी सांगितले. माली सरकारने जारी केलेल्या निवेदनात हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठा फौजफाटा पाठविण्यात आला असल्याचेही सरकारने म्हटले आहे. शेवटचे वृत्त आले तोपर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. हल्ल्यानंतर मालीची राजधानी बामकोमध्ये एका लष्करी तळाबाहेर जोरदार निदर्शने झाली. महिनाभरापूर्वी मालीमध्ये बुकरिना फासोच्या सीमेला लागून असलेल्या भागात दोन जिहादी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात ४० सैनिक ठार झाले होते. आफ्रिकेतील अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जी५ साहेल फौजांसाठी हा हल्ला अवमानकारक आहे. जी५ साहेल फौजेत ५ हजार सैनिक आहेत. बुर्किना फासो, चाड, माली, मॉरिटानिया आणि नायगर या पाच देशांनी एकत्र येऊन ही फौज स्थापन केली आहे. (वृत्तसंस्था)
मालीमध्ये जेहादी बंड उद्भवले आहे. हे बंड शमविण्यासाठी मालीचे लष्कर संघर्ष करीत आहे. उत्तरेकडील ओसाड प्रदेशातून सुरू झालेली ही बंडाळी मध्य मालीपर्यंत आली आहे. अस्थिर असलेला हा संपूर्ण प्रदेश वांशिकदृष्ट्या संमिश्र स्वरूपाचा आहे. २०१२ मध्ये उत्तर मालीमध्ये बंडाची पहिली ठिणगी पडली होती. हे बंड मोडून काढण्यात मालीच्या लष्कराला अपयश आले. तेव्हापासून हा भूभाग अल-कैदाशी संबंधित जेहादी गटांच्या ताब्यात आहे.