बांगलादेशात सत्तापालट, देशात लष्करी राजवट; अखेर सैन्य सरकार कसं चालवतं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:57 PM2024-08-05T21:57:09+5:302024-08-05T21:58:05+5:30

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशात सत्तापालट झाला आहे. आता देशात लष्करी राजवट लागू झाली आहे. 

military rule in the Bangladesh,; After all, how does the military run the government? Know about | बांगलादेशात सत्तापालट, देशात लष्करी राजवट; अखेर सैन्य सरकार कसं चालवतं? जाणून घ्या

बांगलादेशात सत्तापालट, देशात लष्करी राजवट; अखेर सैन्य सरकार कसं चालवतं? जाणून घ्या

नवी दिल्ली - बांगलादेशात सध्या मोठी घडामोड घडली आहे. याठिकाणी हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही तर शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला आहे. आता बांगलादेशात सैन्य सरकार बनवणार आहे. याठिकाणी सैन्य प्रमुख जनरल वकार उज जमान यांनी देशात अंतरिम सरकार बनवलं जाईल असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे बांगलादेशाची कमान आता जनरल वकार यांच्या हाती गेली आहे.

कोण आहे जनरल वकार?

वकार उज जमान बांगालादेशी सैन्यातील सर्वात मोठे अधिकारी आहेत. अलीकडेच त्यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ते आधी लेफ्टनंट जनरल पदावर कार्यरत होते. २३ जून २०२४ रोजी त्यांनी आर्मी चीफ म्हणून पदभार स्वीकारला. पुढील ३ वर्ष ते या पदावर कार्यरत असतील. अखेर सैन्य सरकार कसं चालवतं, त्यात विभागवार मंत्रालयाचं वाटप होतं का की सत्ता एकाच व्यक्तीच्या म्हणजे आर्मी चीफच्या हातात असते हे जाणून घेऊ.

सैन्य शासन कसं असतं?

सैन्य शासन ही एकप्रकारे हुकुमशाही असते. ज्या देशाची सत्ता एक किंवा एकापेक्षा जास्त सैन्य अधिकाऱ्यांच्या हाती असते. आता सैन्य हुकुमशाहीचं नेतृत्व कुठलाही एक अधिकारी करू शकतो किंवा सैन्य अधिकाऱ्यांची एक परिषद मिळून देशाचं सरकार चालवू शकते. 

'या' ३ प्रकारे सेना सरकार चालवतं

लष्करी राजवट- हे लष्करी अधिकाऱ्यांच्या समितीच्या अध्यक्षतेखालील सरकार आहे. यामध्ये देशाची सत्ता सामान्यतः काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात केंद्रित असते ज्यांनी बंडखोरी करून सत्तेवर ताबा मिळवला होता. म्यानमार (बर्मा), अर्जेंटिना आणि ग्रीसमध्ये लष्करी राजवट सरकारे स्थापन झाली आणि देश चालवला गेला.

लष्करी हुकूमशहा- कधी कधी असं घडतं की एकच लष्करी अधिकारी सत्तापालट करतो आणि नंतर देशाचा ताबा आपल्या हातात घेतो. मग तो देशावर हुकूमशहा म्हणून राज्य करू लागतो. असे लष्करी हुकूमशहा अनेकदा स्वतःला राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांसारखी पदे बहाल करतात. दक्षिण अमेरिकन देश चिली आणि स्पेनमध्ये हे घडले आहे. चिलीमध्ये जनरल ऑगस्टो पिनोशे आणि स्पेनमध्ये जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यांनी देशाची सत्ता हस्तगत केली.

तात्पुरते लष्करी सरकार- काही प्रकरणांमध्ये असे घडते की देशाची व्यवस्था सुरळीतपणे पूर्ववत होईपर्यंत तात्पुरते लष्करी सरकार स्थापन केले जाते. हे सरकार राष्ट्रहितासाठी काम करते आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर निवडणुका घेण्याचा दावा करते, जेणेकरून नवीन सरकार स्थापन करता येईल. नायजेरियात असे अनेकदा घडले आहे. लष्करी राजवटीत पुन्हा सरकार स्थापन झाले आहे.

का बनते सत्तापालटाची शक्यता?

कुठल्याही देशात सत्तापालटाची शक्यता जेव्हा देशातील सर्वसामान्य जनता सरकारच्या धोरणाविरोधात किंवा सरकार हुकुमशाह बनते, जनतेच्या हिताची काही देणंघेणं नसते, मनमानीप्रकारे कामकाज करते तेव्हा जनआक्रोश होतो. त्याशिवाय जेव्हा सैन्याला सरकारपासून धोका असल्याची जाणीव होते. अशा स्थितीत सैन्य सरकारविरोधात जाते. सत्तापालट करण्यासाठी सैन्य सरकारविरोधात उतरले. पाकिस्तानात आर्मी चीफ परवेज मुशर्रफ यांनी असेच केले होते. 
 

Web Title: military rule in the Bangladesh,; After all, how does the military run the government? Know about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.