कॅनडामधल्या आगीमुळे लाखो नागरिक विस्थापित
By admin | Published: May 7, 2016 03:23 PM2016-05-07T15:23:11+5:302016-05-07T15:23:11+5:30
कॅनडामधल्या अल्बर्टा प्रांतातल्या आगीने भीषण रूप धारण केले असून लाखाच्या संख्येने लोक विस्थापित झाले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
अल्बर्टा (कॅनडा), दि. 7 - कॅनडामधल्या अल्बर्टा प्रांतातल्या आगीने भीषण रूप धारण केले असून लाखाच्या संख्येने लोक विस्थापित झाले आहेत. हजारो लोकांना हेलीकॉप्टर्सच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्यानंतर, त्यांच्यासाठी जे निवारे उभारण्यात आले आहेत, ते देखील आघीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता दिसत आहे.
फोर्ट मॅक्मरी या शहराची धुळधाण उडाली असून जवळपास 80 हजार नागरिकांना शहर सोडून जावे लागले आहे. त्याआधी जवऱपास 25 हजार विस्थापितांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आले होते, ज्या छावण्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती आहे. त्यामुळे या नागरिकांना पुन्हा हलवावे लागणार आहे.
जवळपास 49 ठिकाणी आगी लागल्या असून 1100 आगीचे बंब आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार हा संपूर्ण परीसर युद्धभूमीसमान भासत आहे.
हजारो लोकं शहर सोडताना संपूर्ण शहर जळताना बघत आहेत. गेल्या दोन दिवसात एका भागातून तब्बल 16000 जणांना हेलीकॉप्टर्सच्या सहाय्याने वाचवण्यात आले.
गेला एक आठवडा ही आग धुमसत असून आता तिचा आकार वाढत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. फोर्ट मॅक्मरीलगतच्या जंगलाला आग लागल्यामुळे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असले तरी, जंगलाला लागलेली आग नैसर्गिक कारणांमुळे नसून मानवी चुकीमुळे असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.