लाखो अमेरिकन तरुण सोडताहेत शिक्षण; प्रगतीला मोठा खोडा बसण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:35 AM2022-08-08T07:35:02+5:302022-08-08T07:35:11+5:30
शिक्षणाच्या या आस्थेमुळेच जगात अनेक देशांत भारतीय नागरिकांना स अतिशय सन्मानानं बोलवलं जातं.
आपल्या आयुष्यात शिक्षणाचं स्थान काय?.. - खरं तर अतिशय महत्त्वाचं. आजकाल अगदी गरीब, अशिक्षित पालकांनाही शिक्षणाचं महत्त्व पटलंय. मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं तरच त्यांचं वर्तमान आणि भविष्य बदलू शकतं यावर जणू त्यांचा गाढ विश्वास बसला आहे. त्यामुळे स्वत:च्या पोटाला चिमटा देऊनही अनेक पालक आपल्या मुलांना शिकवतात. त्यांनी पुढे जावं, हालअपेष्टांतून बाहेर पडावं यासाठी जिवाचा ते अक्षरश: आटापिटा करतात. भारतात शिक्षणाबद्दलची ही आस्था जवळपास प्रत्येक घरात आढळते.
शिक्षणाच्या या आस्थेमुळेच जगात अनेक देशांत भारतीय नागरिकांना स अतिशय सन्मानानं बोलवलं जातं. त्या त्या देशांत भारतीयांनी आपल्या ज्ञानाच्या आणि क्षमतेच्या जोरावर मोठं योगदान देताना अनेक नामांकित संस्थांमध्ये मानाच्या जागाही पटकावल्या आहेत. अमेरिकेसारख्या देशांत तर भारतीयांचं हे प्रमाण खूपच मोठं आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात ‘भारतीयांमुळे आमच्या नोकऱ्यांवर गंडांतर येतं आहे’, अशी ओरड अमेरिकेत सुरू झाली आहे.
अमेरिका हा देश जगातला सर्वाधिक प्रगत देश समजला जातो, पण तिथे शिक्षणाबाबत काय स्थिती आहे? आपल्याला वाटत असेल, तिथले तरुण शिक्षणाबाबत अतिशय उत्साही अन् उत्सुक असतील, पण वास्तव तसं नाही. अलीकडच्या काळात अमेरिकन तरुणांचा शिक्षणावरचा विश्वास बऱ्यापैकी उडाला आहे. शिकून काय फायदा होणार आहे, इतकी वर्षं शिकायचं, त्यासाठी भलामोठा खर्च करायचा आणि शेवटी आपल्या हातात काय पडणार, याबाबत अमेरिकन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक भावना वाढते आहे. याचाच परिणाम म्हणून उच्च शिक्षणातील तरुणांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं घटते आहे. शिक्षण घेण्यापेक्षा, पटकन कामाला लागावं, चार पैसे कमवावेत आणि आपलं आयुष्य ‘सेटल’ करावं, अशी भावना अमेरिकन तरुणांमध्ये वाढीस लागते आहे. त्यामुळे तेथील उच्च शिक्षणातील गळती दिवसेंदिवस वाढतेच आहे.
कोरोना काळात सगळ्या जगातच शिक्षणाचा खेळखंडोबा झाला होता. अमेरिकाही त्याला अपवाद नाही, पण आता जग आणि अमेरिकाही कोरोनातून बऱ्यापैकी सावरत असतानाही तरुणवर्ग शिक्षणाकडे पुन्हा परतताना दिसत नाही. अमेरिकेतील उच्च शिक्षणातील ही घसरण किती असावी? - गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अमेरिकेत यंदा उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १४ लाखांनी घटली आहे. शिक्षणतज्ज्ञांचेही डाेळे यामुळे पांढरे झाले असून, अमेरिकेच्या भवितव्यासाठी ही परिस्थिती अतिशय घातक आहे, अमेरिकेच्या प्रगतीला यामुळे मोठा खोडा बसू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी यासाठी अमेरिकन सरकारलाही त्यांनी साकडं घातलं आहे.
अमेरिकेच्या नॅशनल स्टुडंट क्लिअरिंग हाऊस रिसर्च सेंटरनं (एनएससीआरसी) नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे. या अहवालानं अमेरिकेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्याच्या वास्तवावर सरकार, तज्ज्ञ आणि जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल सात लाख विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडून शिक्षणाला रामराम ठोकला आहे. गेल्या दोन वर्षांतील विद्यार्थ्यांची ही घट जवळपास १४ लाख इतकी आहे.
‘एनएससीआरसी’ ही संस्था दरवर्षी अमेरिकेतील उच्च शिक्षणासंदर्भातील आपला अहवाल प्रसिद्ध करते. त्यांचा हा अहवाल अमेरिकेतील शैक्षणिक धोरण ठरविण्यात मैलाचा दगड मानला जातो. कारण अमेरिकेतील तब्बल ३६०० उच्च शिक्षण संस्थांचा तौलनिक आणि सूक्ष्म अभ्यास करून हा अहवाल तयार केला जातो. तरुण आणि तरुणी, दोघांचीही उच्च शिक्षणातील टक्केवारी घसरत असल्यानं ही देशासाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा राजकारणी आणि तज्ज्ञांनी दिला आहे. केवळ विद्यार्थीच नाही, तर त्यांच्या पालकांमध्येही उच्च शिक्षणाबद्दल नकारात्मक भावना वाढते आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाबाबत एक वेळ ठीक आहे, पण कॉलेजमध्ये जाऊन आमच्या मुलांचं, आमचं काय भलं झालंय, होतंय, हे तुम्हीच सांगा, असा खडा सवाल आता पालक आणि विद्यार्थ्यांकडून जाहीरपणे विचारला जात आहे. सरकारकडे या प्रश्नाचं काहीही उत्तर नाही.
अमेरिकेची नवी डोकेदुखी
विद्यार्थी आणि पालकांच्या मते उलट उच्च माध्यमिक शिक्षणानंतर नोकऱ्यांच्या संधी बऱ्यापैकी जास्त आहेत, उच्च शिक्षण म्हणजे केवळ वेळ, पैसा आणि नोकरीच्या संधी गमावणं यापेक्षा दुसरं काहीही नाही. अमेरिकेत आर्थिक प्रश्नांनी डोकं वर काढलेलं असताना आता या नव्या प्रश्नानं त्यांची डोकेदुखी वाढली आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांतली सुंदोपसुंदीही यामुळे वाढली आहे.