लाखो अमेरिकन्स घर सोडून मेक्सिकोत !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 05:57 AM2022-09-01T05:57:34+5:302022-09-01T05:58:24+5:30

International: कोरोना काळाची जी धग जगाला बसली त्यातून जग अजूनही सावरलेलं नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाला, पण एक महत्त्वाची गोष्ट त्या काळात घडली, ती म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’! घरून काम करण्याच्या या नव्या पद्धतीमुळे अनेकांच्या नोकऱ्या टिकल्या, शाबूत राहिल्या, उद्योगधंद्यांनाही त्याचा मोठा फायदा झाला.

Millions of Americans leave their homes & going to Mexico! | लाखो अमेरिकन्स घर सोडून मेक्सिकोत !

लाखो अमेरिकन्स घर सोडून मेक्सिकोत !

googlenewsNext

कोरोना काळाची जी धग जगाला बसली त्यातून जग अजूनही सावरलेलं नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाला, पण एक महत्त्वाची गोष्ट त्या काळात घडली, ती म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’! घरून काम करण्याच्या या नव्या पद्धतीमुळे अनेकांच्या नोकऱ्या टिकल्या, शाबूत राहिल्या, उद्योगधंद्यांनाही त्याचा मोठा फायदा झाला. कर्मचारी घरून काम करू लागल्यामुळे व्यवस्थापनावरचा कंपन्यांचा मोठा खर्च तर वाचलाच, पण उद्योग चालू राहाण्यात या ‘वर्क फ्रॉम होम’नं अतिशय कळीची भूमिका निभावली. कोरोना काळातून बाहेर येत असताना आता जगात अनेक ठिकाणी कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झालं असलं, ‘वर्क फ्रॉम होम’ कमी झालं असलं तरी या पद्धतीचा फायदा लक्षात आल्यामुळे अमेरिकेत अजूनही अनेक कंपन्यांमध्ये ही व्यवस्था सुरू आहे. एवढंच नाही, बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देऊन टाकली आहे.

ही सोय नसताना सर्वच कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीचं कार्यालय ज्या शहरांमध्ये आहे, त्या ठिकाणी हजर राहणं अनिवार्य होतं. पण याठिकाणी राहाण्या-खाण्याचा, लाइफस्टाइलचा खर्च प्रचंड होता. कर्मचारी जेवढं कमवत होते, त्यातला बराचसा खर्च या गोष्टींवरच होत होता आणि त्यांच्या हाती फारसं काही पडत नव्हतं, पण आता बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कायमस्वरूपी देऊन टाकल्यानं अनेक अमेरिकन कर्मचाऱ्यांनी आपला देशच सोडायला सुरुवात केली आहे. जवळच्या मेक्सिको या देशात त्यांनी स्थलांतर केलं आहे. केवळ काही महिन्यांत ही संख्या १६ लाख इतकी झाली आहे. लॉस एंजेलिस, न्यू यॉर्क, कॅलिफोर्निया इत्यादी अनेक प्रांतातील कर्मचाऱ्यांनी स्वस्ताई असलेल्या शेजारच्या मेक्सिको या देशांमध्ये आपलं बस्तान बसवायला घेतलं आहे.

अमेरिकन लोकांना लागणाऱ्या साऱ्या सुविधा तर इथे आहेतच, शिवाय त्याही अमेरिकेतील खर्चाच्या जवळपास निम्म्या किंवा त्यापेक्षाही कमी किमतीत. याशिवाय आपली लाइफस्टाइल टिकवून ठेवण्यासाठी लागणारा खर्चही इथे खूपच कमी आहे. मेक्सिकोमध्ये अनेक अमेरिकन नागरिकांनी भाड्यानं घरं घेण्यास सुरुवात केली आहे. तेथील घरमालकांनीही अमेरिकन लोकांना हवं त्याप्रमाणे आपली घरं रिनोव्हेट करायला घेतली आहेत. कारण, स्थानिक लोकांकडून त्यांना जेवढं भाडं मिळतं, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त भाडं त्यांना या अमेरिकन भाडेकऱ्यांकडून मिळतंय. पण त्याचवेळी आणखी एक गोष्ट सध्या मेक्सिकोमध्ये पाहायला मिळते आहे. ज्या ठिकाणी अमेरिकन लोकांची वस्ती वाढू लागली आहे, त्या ठिकाणची केवळ घरंच नाही, इतरही अनेक गोष्टींच्या किमती वाढत आहेत.  

अर्थात मेक्सिकोतल्या काही लोकांनी अमेरिकन लोकांचं उत्साहानं स्वागत केलं आहे, कारण त्यांना त्यांच्यापासून मोठा धंदा मिळतो आहे, त्याचवेळी काही मेक्सिकन नागरिकांनी अमेरिकनांच्या विरोधात ‘गो बॅक अमेरिकन्स, वी डोण्ट वॉण्ट यू’ म्हणून नारे लावायला सुरुवात केली आहे. ज्या-ज्या ठिकाणी अमेरिकनांची वस्ती वाढते आहे, त्याठिकाणी महागाई वाढल्यानं अनेक स्थानिक नागरिकांना त्या भागातून स्थलांतर करावं लागतं आहे. त्या भागात स्थानिक स्पॅनिश भाषेपेक्षा इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणावर ऐकू यायला लागली आहे. 

जे स्थानिक नागरिक घर भाड्यानं घेऊन राहतात, त्यांच्यासाठी जगणं फारच अवघड झालं आहे. अमेरिकन्स जे भाडं देतात, ते त्यांना परवडत नसल्यामुळे त्यांना स्थलांतर करावं लागत आहे. जे अमेरिकन लोक आतापर्यंत इथे पर्यटक म्हणून येत होते, ते अचानक ‘शेजारी’ झाल्यामुळे स्थानिक नागरिकांची पंचाईत होत आहे. 

एरिक रॉड्रिग्ज हा ३७ वर्षीय आर्थिक विकास विश्लेषक. अमरिकेतील वाढत्या महागाईमुळे गेल्या काही महिन्यांपूर्वीच तो मेक्सिकोत स्थायिक झाला. तो म्हणतो, ज्यावेळी मी आणि माझ्यासारखे लोक इथे आले, त्यावेळी आमचं मोठ्या उत्साहानं स्वागत करण्यात आलं, पण आता परिस्थिती बदलते आहे. आम्हाला स्थानिकांकडून विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे मी आणखी किती काळ इथे राहीन, हे सांगता येत नाही..

Web Title: Millions of Americans leave their homes & going to Mexico!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.