अन्न-पाण्याविना लाखो लोक संकटात; गाझात अनेक भागांची वीज तोडली, मदतकार्यही ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:50 PM2023-10-14T12:50:51+5:302023-10-14T12:51:15+5:30
या संघर्षामुळे गाझातील लाखो रहिवाशांना अन्नधान्य, औषधे तसेच पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्या भागातील पिण्याचे पाणी, वीजदेखील तोडण्यात आली आहे.
सॅन दिएगो : हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा भागाला घेरले असून तिथे जोरदार मारा करण्यात येत आहे. या संघर्षामुळे गाझातील लाखो रहिवाशांना अन्नधान्य, औषधे तसेच पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्या भागातील पिण्याचे पाणी, वीजदेखील तोडण्यात आली आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास गाझामधील रहिवाशांवरील संकट आणखी गहिरे होण्याचा इशारा मानवतावादी संघटनांनी दिला आहे.
संघटनांकडून लोकांना अन्नधान्य, वैद्यकीय मदत पुरविली जाते. त्या भागातील सुमारे ६३ टक्के लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यात संघटना यशस्वी झाल्या होत्या. मात्र, २३ लाख लोकांना अन्नधान्य, इंधन व तसेच इतर वस्तूंचा पुरवठा करण्यास इस्रायलने १० ऑक्टोबरला बंदी घातली.
युद्ध इतर देशांत पसरेल: इराण
गाझावर इस्रायलने हल्ले करणे त्वरित न थांबविल्यास हे युद्ध पश्चिम आशिया व अन्य देशांतही पसरू शकते, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियां यांनी दिला आहे. त्यांनी लेबनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी इस्रायलच्या हल्ल्यांबाबत चर्चेनंतर सिरियाचा दौरा केला.
मध्य-पूर्व देशांत निदर्शने
मध्य- पूर्व देशांमध्ये हजारो लोकांनी पॅलेस्टाइनला पाठिंबा दर्शविण्यासाठी व इस्रायलचा निषेध करण्याकरिता निदर्शने केली. लेबनॉनमधील बैरूत शहर, इराणमधील तेहरान, इराकमधील बगदाद शहरात अशी निदर्शने झाली. पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये काही जणांनी इस्रायल, अमेरिकेचे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले.
१६ वर्षांपासून बंदी
मदतकार्य करणाऱ्या संघटनांचे काम ठप्प झाले आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायलने अनेक वस्तूंचा पुरवठा करण्यास गेल्या १६ वर्षांपासून बंदी घातली आहे. मात्र अन्नधान्य, इंधन यांच्या पुरवठ्यावर बंदी नव्हती.
तर तडफडून मरतील
संघर्ष लांबला तर गाझातील लाखो लोक अन्न-पाण्यावाचून तडफडून मरण्याची शक्यता असल्याची भीती मानवतावादी कार्य करणाऱ्या संघटनांनी व्यक्त केली आहे.