नऊ निष्पापांचा बळी घेऊन म्युनिक हल्लेखोराची आत्महत्या
By admin | Published: July 24, 2016 02:14 AM2016-07-24T02:14:10+5:302016-07-24T02:14:10+5:30
म्युनिक शहरातील शॉपिंग सेंटरवर शुक्रवारी गोळीबार करून नऊ जणांचा बळी घेत १६ जणांना जखमी करणारा हल्लेखोर अवघा १८ वर्षांचा मुलगा होता आणि हल्ल्यानंतर त्याने आत्महत्या
म्युनिक : म्युनिक शहरातील शॉपिंग सेंटरवर शुक्रवारी गोळीबार करून नऊ जणांचा बळी घेत १६ जणांना जखमी करणारा हल्लेखोर अवघा १८ वर्षांचा मुलगा होता आणि हल्ल्यानंतर त्याने आत्महत्या केली. या जर्मन-इराणियन मुलगा निराशेने ग्रासला होता, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. त्याने एकट्याने हल्ला केला. त्याचे कोणीही साथीदार नव्हते, असे स्पष्ट झाले आहे. युरोपमध्ये गेल्या आठ दिवसांत झालेला हा तिसरा हल्ला आहे. म्युनिकमधील या हल्ल्याचे धक्के संपूर्ण युरोपात जाणवले. येथील सर्वाधिक खपाच्या बिल्ड या वृत्तपत्राने म्युनिचमध्ये रक्तपात या मथळ््याखाली हल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध केले.
हल्ला करणारा मुलगा म्युनिकमधीलच रहिवासी होता. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याचा हेतू स्पष्ट होऊ शकला नाही, असेही ते म्हणाले. हॅण्डगन घेऊन आलेल्या या मुलाने आधी मॅकडोनाल्ड उपाहारगृहात अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर तो मॉलमध्ये शिरला आणि तेथेही गोळीबार केला. गस्ती पथकातील एका पोलिसाने त्याला गोळी मारून जखमी केले. मात्र, तो मॉलमधून निसटण्यात यशस्वी झाला.
आम्हाला एकाचा मृतदेह मिळाला असून त्याने स्वत:ला ठार केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका व्हीडीओत काळ््या पेहरावातील एक बंदुकधारी लोकांवर गोळ््या झाडत रस्त्यावरून जाताना व लोक ओरडत सैरावैरा पळताना दिसतात. हल्लेखोर वाहनतळाच्या छतावरून जवळच्या बाल्कनीतील व्यक्तीशी वाद घालताना एका व्हिडीओत दिसतो. बाल्कनीतील व्यक्तीने परदेशी लोकांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्यानंतर हल्लेखोर मुलगा, मी जर्मन आहे, येथे जन्मलो आहे, असे त्याला सांगताना यात दिसतो. या हल्ल्यात तीन जण सहभागी आहेत, असे पोलिसांना आधी वाटत होते. (वृत्तसंस्था)
सर्व भारतीय सुरक्षित
जर्मनीतील हल्ल्यात बळी पडलेल्यांत एकही भारतीय नसल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी येथे सांगितले. जर्मनीतील भारतीय राजदूत गुरजितसिंग यांच्याशी मी संपर्क साधला होता. त्यांनीच ही माहिती दिली, असे टिष्ट्वट स्वराज यांनी केले. गोळीबाराच्या घटनेनंतर म्युनिचमधील भारतीय वकिलातीने तेथील भारतीयांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.