Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video : देवाचा धावा, मनातली धाकधूक अन् मीराबाईच्या कुटुंबीयांचा एकच जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 02:47 PM2021-07-24T14:47:04+5:302021-07-24T14:49:22+5:30

Mirabai Chanu, Tokyo Olympics: टोकियोमध्ये इतिहास रचल्यानंतर मिराबाई चानूच्या मणिपूर येथील राहत्या घरी देखील जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. पण मिराबाई चानू हिचा आजवरचा प्रवास फार खडतर राहिला आहे.

Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video: mirabai chanu's family and relative celebrate their daughter's victory ot tokiyo olympic | Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video : देवाचा धावा, मनातली धाकधूक अन् मीराबाईच्या कुटुंबीयांचा एकच जल्लोष

Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video : देवाचा धावा, मनातली धाकधूक अन् मीराबाईच्या कुटुंबीयांचा एकच जल्लोष

Next

नवी दिल्ली - जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अभियानाची दमदार सुरुवात झाली आहे. भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं आज झालेल्या ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. मीराबाईच्या खेळाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, साहजिकच तिचं गाव, तिची माणसं आणि तिचे कुटंबीयही या क्षणाकडे डोळे लावून बसल होते. तो क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे.   

टोकियोमध्ये इतिहास रचल्यानंतर मिराबाई चानूच्या मणिपूर येथील राहत्या घरी देखील जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. पण मिराबाई चानू हिचा आजवरचा प्रवास फार खडतर राहिला आहे. खूप संघर्षानंतर मीराबाई चानू हिला आजचा दिवस पाहायला मिळतो आहे. त्यामुळेच, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या कुटुंबीयांनाही अत्यानंद झाला आहे. मीराबाईच्या रौप्यपदकाची कमाई तिच्या नातेवाईकांसह, कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर अत्यानंद उमटवणारी आहे, हा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मीराबाईचा अंतिम सामना सुरु असताना गावाकडील घरात टीव्हीकडे डोळे लावून बसलले शेजारी, नातेवाईक आणि तिचे कुटुंबीय, देवाकडे सुरू असलेला धावा आणि तिच्या विजयानंतर झालेला जल्लोष कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तिच्या कुटुंबीयांनी रौप्य पदकाच्या विजयानंतर तिचं अभिनंदन करत, आनंद साजरा केला. 

मीराबाईचा खडतर प्रवास
 
मणिपूरच्या मीराबाईनं आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. मीराबाईला वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन प्रशिक्षण केंद्रात जावं लागायचं. तिथून आल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास यातच संपूर्ण दिवस निघून जायचा. मीराबाईचं गाव इम्फाळपासून २२ किमी दूरवर आहे. 

रिओत अपयश, टोकियोत मिळवलं यश

रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली होती. कारण, याकाळात ती नैराश्याचा सामना करत होती. वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. पण नैराश्यावरही मात करुन मीराबाईनं दमदार पुनरागन केलं आणि आज टोकियोमध्ये इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी मीराबाई दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यासोबतच वेटलिफ्टिंमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी देखील ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं कांस्य पदकाची कमाई केली होती. 

लाकडी रॉडनं केला सराव

मीराबाईनं मणिपूरच्या कुंजुरानी यांना पाहून वेटलिफ्टर होण्याचा निश्चय केला आहे. २००७ साली जेव्हा तिनं सरावाला सुरुवात केली तेव्हा तिच्याकडे लोखंडी रॉड नव्हते, त्यावेळी लाकडी रॉडनंच तिला सराव करावा लागत होता. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू व्हायचं म्हटलं तर आहारावरही लक्ष द्यावं लागतं आणि मीराबाईच्या आहाराची गरज पूर्ण करणं त्यांच्या कुटुंबीयांना परवडणारं नव्हतं. तरीही मीराबाईच्या आईनं खडतर मेहनत करुन तिच्या आहारात कोणताही कमतरता येणार नाही याची काळजी घेतली. 

चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णकमाई

कुटुंबीयांनी आपल्यावर केलेला खर्च आणि त्यांनी पाहिलेले हलाकिचे दिवस तिला रिओ ऑलिम्पिकमध्ये आलेल्या अपयशानंतर फारच मनाला लागले. त्यानंतर ती नैराश्यात गेली. पण त्यावरही मात करुन तिनं आणखी मेहनत करण्याचा निश्चय केला आणि ती सातत्यानं सराव करण्यास सुरुवात केली. रिओ ऑलिम्पिकमधील अपयशानंतर मीराबाई जास्तीत जास्त वेळ प्रशिक्षण केंद्रातच व्यतीत करायचं. ती घरी कमी आणि प्रशिक्षण केंद्रात जास्तवेळ राहू लागली. याआधी मीराबाईनं २०१४ साली ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत तिनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 

Web Title: Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video: mirabai chanu's family and relative celebrate their daughter's victory ot tokiyo olympic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.