चमत्कारच म्हणा ना... नऊ दिवसांनी ढिगाऱ्यातून महिला जिवंत बाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 10:59 AM2023-02-15T10:59:32+5:302023-02-15T11:00:33+5:30
महिलेला वाचवले; अशी चौथी घटना
अंकारा : तुर्कस्तानातील भूकंपानंतर सुमारे २०३ तासांनी चमत्कारिकरीत्या एक महिला ढिगाऱ्यात जिवंत सापडली. अशा प्रकारची ही मागील काही दिवसांतील चौथी घटना आहे. ४० वर्षीय महिलेला दक्षिणेकडील हाते प्रांतातील इमारतीच्या ढिगाऱ्यातून कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहेर खेचले. तिची ओळख अद्याप अज्ञात आहे. बचावकर्त्यांनी आदल्या दिवशीच ढिगाऱ्यातून तीन जणांची सुखरूप सुटका केली होती.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांनी तुर्कीसोबत आणखी दोन सीमा खुल्या करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे संयुक्त राष्ट्र भूकंपाशी संबंधित मदत सामग्री सीरियामध्ये पाठवू शकणार आहे. सीरियामध्ये २०११ मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धानंतर प्रथमच या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत.
तुर्की-सीरियात भारताचे ३०० सैनिक
तुर्कस्तानमध्ये मदतीसाठी भारत सरकारने सात विमाने आणि ३०० जवानांच्या माध्यमातून मदत सामग्री पाठवली आहे. याशिवाय प्रशिक्षित कुत्रे हनी आणि रॅम्बोही कर्तव्य बजावत आहेत.
...मग मुलाचे नाव ‘तुर्की चौधरी’ ठेवा!
n‘ऑपरेशन दोस्त’चा भाग म्हणून तुर्कीला गेलेले हवालदार राहुल चौधरी यांना नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांना आपल्या मुलाला पाहण्याची खूप ओढ लागली; पण तूर्त तरी या बाप-लेकाची भेट होणे कठीण. लष्करातील त्यांच्या मित्रांनी या मुलाचे नाव तुर्की चौधरी ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
nउत्तर प्रदेशातील हवालदार चौधरी तुर्कीला गेलेल्या ९९ सदस्यीय संघाचा भाग आहेत. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते घरी जाणार होते.