बुडत्याला...! समुद्राच्या अजस्त्र लाटांत वाहून गेलेला; 18 तासांनी जिवंत सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 06:39 PM2022-07-15T18:39:59+5:302022-07-15T18:41:23+5:30
इवानच्या मित्रांनी याची माहिती कोस्टगार्डला दिली. कोस्टगार्डने देखील आशा सोडली आणि तो समुद्रात बुडाला असेल असे म्हटले.
बुडत्याला काडीचा आधार, अशी म्हण आहे. आज ती प्रत्यक्षात आली आहे. ओमानमध्ये जसे कुटुंब समुद्राच्या अजस्त्र लाटांत वाहून गेलेले तसाच प्रकार ग्रीसमध्ये घडला होता. तिथे दोन तरुण समुद्राच्या लाटांत वाहून गेले होते. पण एका तरुणाच्या हाताला फुटबॉल लागला आणि तो वाचल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे.
हा तरुण समुद्र किनाऱ्यावर उभा होता, तेवढ्यात वेगाने लाट आली आणि त्याला घेऊन गेली. तो बुडत असताना त्याच्या बाजुला एक फुटबॉल आला. त्याने तो फुटबॉल दोन्ही हातांनी घट्ट पकडला आणि आपले प्राण वाचविले. १८ तास तो समुद्रात या फुटबॉलच्या आधारावरच जिवंत होता. त्याला फुटबॉलमुळे पाण्यात तरंगत राहण्यास मदत मिळाली.
३० वर्षीय इवान हा नॉर्थ मैसोडेनिया देशातील राहणारा आहे. तो ग्रीसच्या मिती बीचवर फिरण्यासाठी आला होता. यावेळी समुद्राच्या लाटांनी त्याला आतमध्ये खेचले. इवानच्या मित्रांनी याची माहिती कोस्टगार्डला दिली. कोस्टगार्डने देखील आशा सोडली आणि तो समुद्रात बुडाला असेल असे म्हटले.
इवानच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. जवळपास १८ तास शोध सुरु होता. तेव्हा बचाव पथकाला एका फुटबॉलसारख्या वस्तूला एक व्यक्ती धरून असल्याचे दिसले. १० जुलैची ही घटना आहे. इवानसोबत त्याचा आणखी एक मित्र मार्टिन जोवनोवस्की देखील समुद्रात खेचला गेला होता. त्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. इवानवर उपचार सुरु आहेत.