चमत्कार : ढिगाऱ्याखालून ४० तासांनी कुटुंबाची सुटका; तुर्कस्तान, सिरियाचा सावरण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 07:18 AM2023-02-10T07:18:12+5:302023-02-10T07:19:04+5:30
सिरियात भूकंपानंतर तब्बल ४० तासांनी एका पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाचजणांच्या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
अंकारा : तुर्कस्तान आणि सिरियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने तेथील नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त केले. त्यातही काही नागरिक ढिगाऱ्याखाली जिवंत सापडत असल्याने हा एक चमत्कारच समजला जात आहे. सिरियात भूकंपानंतर तब्बल ४० तासांनी एका पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाचजणांच्या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
इडलिब शहरात तब्बल ४० तासांनी या कुटुंबाला वाचविण्यात यश आले. बचावकर्त्यांनी प्रथम वडिलांना बाहेर काढले. त्यांना लगेच स्ट्रेचरवर रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर एका लहान मुलाला बाहेर काढण्यात आले. त्याला बाहेर काढताच तेथे जमलेल्या गर्दीने एकच जल्लोष केला. त्यामुळे ते बालक गोंधळले. नंतर एका मुलीला बाहेर काढण्यात आले. नंतर एक-एक करत पाच कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले. बचाव पथकातील फातिमा आबिद यांनी कुटुंबाची तब्येत चांगली असल्याची माहिती दिली.
‘‘या कुटुंबाला वाचवता आल्याने आम्हाला अत्यानंद झाला. आम्हाला पुढे जाण्यासाठी आणि जास्तीत जास्त क्षमतेने काम करत राहण्यासाठी प्रेरणा आणि उत्साह मिळाला,’’ असे त्या म्हणाल्या.
मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार
सीरियात मारल्या गेलेल्यांना दफन करण्यासाठी सामूहिक कबरी बांधल्या जात आहेत. मृतांची संख्या प्रचंड असल्याने या कबरीतच सामूहिक दफन केले जात आहे.
मदत पोहोचविण्यात अपयश
भूकंपग्रस्त भागात मदत वेळेवर पोहोचत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी ही बाब मान्य केली आहे. सरकारविरोधातील लोकांचा रोष पाहून एर्दोगन म्हणाले भूकंपानंतर सरकारच्या सुरुवातीच्या मदत मोहितमेत उणिवा होत्या.
ऑपरेशन दोस्त
भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत सहावे विमान तुर्कस्तानला पाठवले आहे. बचावकार्यात एनडीआरएफने नुरदगी येथे एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा वर्षे वयाच्या बालिकेची सुटका केली. त्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
माझ्या आई, भावाला वाचवा हो...
अंताक्या शहरात सेरप अर्सलान नावाची महिला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याकडे साश्रुनयनांनी पाहत होती. या ढिगाऱ्यात तिची आई व भाऊ अडकलेले आहेत. बुधवारपासून ढिगारे हटवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे, असे सेरप यांनी सांगितले. “बरेच दिवसांपासून त्यांचा आवाज येत नाही. काहीही नाही”, असे सेलेन एकिमनने हातातील मोजांनी अश्रू पुसत सांगितले.
मुलीसह वडिलांना वाचवले
- अंताक्या शहरात आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून हेजल गनेर नावाच्या मुलीला आणि तिचे वडील सोनेर गुनेर यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले.
पुन्हा भूकंप
इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ प्रांताला गुरुवारी भूकंपाचा धक्का बसला. यामुळे एक तरंगते उपाहारगृह समुद्रात बुडून चार जण ठार झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अवघ्या २२ कि. मी. खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ एवढी नोंदली गेली. भूकंपामुळे घरे, इमारती व वैद्यकीय सुविधांचेही नुकसान झाले.