संसदेची दिशाभूल; बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 05:53 AM2023-06-11T05:53:28+5:302023-06-11T05:53:48+5:30
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसद सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिला.
लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी संसद सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिला. पार्टीगेट प्रकरणात आपल्याला षडयंत्र करून गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
जॉन्सन यांनी पंतप्रधान असताना कोविड-१९ च्या लॉकडाऊन काळात पंतप्रधान निवासात पार्ट्यांचे आयोजन करून याबाबत संसदेला दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप आहे. एक सांसदीय समिती त्याची चौकशी करत आहे. या समितीच्या अप्रकाशित अहवालाची एक प्रत शुक्रवारी जॉन्सन यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या प्रकरणाला ‘पार्टीगेट’ असे नाव मिळाले असून, दोषी ठरल्यास त्यांच्यावर प्रतिबंध लावला जाऊ शकतो.
जॉन्सन यांनी म्हटले की, ‘‘विशेषाधिकार समितीची ही चौकशी म्हणजे ‘कांगारू न्यायालय’ आहे. अहवाल मिळाल्यानंतर मी सुन्न झालो. मला संसदेतून बाहेर काढण्याच्या षडयंत्राचा हा भाग आहे. मी हेतूत: हाऊस ऑफ कॉमन्सची दिशाभूल केल्याचा एकही पुरावा समितीने सादर केलेला नाही.’’
गेल्यावर्षी पोलिसांनी जॉन्सन आणि तत्कालीन वित्तमंत्री ऋषी सुनक (आता पंतप्रधान) यांना लॉकडाऊन काळात ‘डाऊनिंग स्ट्रीट’मध्ये पार्टी आयोजित केली म्हणून दंड ठोठावला होता. पदावर असताना कायदा मोडल्याप्रकरणी दोषी ठरलेले ते पहिले पंतप्रधान ठरले होते.