चालण्याबद्दल पैसे देणारे मोबाईल अॅप!
By admin | Published: November 23, 2015 11:49 PM2015-11-23T23:49:34+5:302015-11-23T23:49:53+5:30
व्यायाम करावा असे खूप मनात येते; पण ते प्रत्यक्षात उतरत नाही? मग तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप नक्की डाऊनलोड करून घ्या.
लंडन : व्यायाम करावा असे खूप मनात येते; पण ते प्रत्यक्षात उतरत नाही? मग तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप नक्की डाऊनलोड करून घ्या. हे अॅप तुम्हाला चालण्यासाठी उद्युक्त करेल, एवढेच नाही तर ते तुम्हाला चालण्याबद्दल चक्क पैसेही देईल!
‘गो!’ हे अॅप वापरकर्त्याने चाललेल्या पावलांची मोजणी आणि खातरजमा करते व त्याला चाललेल्या प्रत्येक सुमारे १० हजार पावलांसाठी (अंदाजे ८ कि.मी.) एक ‘बिटवॉकिंग डॉलर’ एवढे पैसेही देते. ‘बिटवॉकिंग डॉलर’ हे नवे डिजिटल ‘क्रिप्टो’ चलन आहे.
‘बीबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार खात्यावर जमा होणारी ही ‘बिटवॉकिंग डॉलर’ची रक्कम अॅप वापरणाऱ्यास आॅनलाईन खरेदी करण्यासाठी वापरता येईल किंवा त्याच्या बदल्यात नियमित चलनातील रोख रक्कम घेता येईल.
मोबाईल फोनमधील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) व वाय-फाय कनेक्शनच्या साह्याने हे अॅप वापरकर्त्याने किती पावले चालली याचा हिशेब ठेवते. सुरुवातीला ब्रिटन, जपान, मालावी आणि केनिया या देशांमध्ये हे नवे अॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे.
हा नवा आणि अभिनव असा ग्राहकोपयोगी उपक्रम हाती घेण्यासाठी उद्योजकांनी गुंतवणूकदारांकडून सुरुवातीची गुंतवणूक म्हणून १० दशलक्ष डॉलर प्राप्त करण्यात यश मिळविले आहे. यातून डिजिटल क्रिप्टो चलन देणे व वापरकर्त्याने चाललेल्या पावलांच्या गणतीचे संकलन करून ठेवण्याची यंत्रणा उभी करणे त्यांना शक्य झाले आहे. (वृत्तसंस्था)